अरुंद रेल्वे पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन रोडच्या अरुंद पुलावर चेंगराचेंगरी झाल्याने मुंबईतील अशा अनेक स्थानकांवरील अरुंद पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तो डिसेंबर 2016मध्येच "सकाळ'ने मांडला होता. "सकाळ'च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच चेंगराचेंगरीत प्रवाशांना प्राण गमावावे लागले.

मुंबई - एल्फिन्स्टन रोडच्या अरुंद पुलावर चेंगराचेंगरी झाल्याने मुंबईतील अशा अनेक स्थानकांवरील अरुंद पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तो डिसेंबर 2016मध्येच "सकाळ'ने मांडला होता. "सकाळ'च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच चेंगराचेंगरीत प्रवाशांना प्राण गमावावे लागले.

मुंबईतील पश्‍चिम रेल्वेवरील दादर व मुंबई सेंट्रल या स्थानकांवरील चार नंबरच्या फलाटांचे दक्षिण टोक जेमतेम पाच ते सहा फूट रुंद आहे. सांताक्रूझ स्थानकाचा चार नंबरचा फलाटही उत्तरेला अरुंद आहे, तर जोगेश्‍वरी व परळ या स्थानकांचे एक आणि दोन नंबरचे आयलंड फलाटही अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे येथेही गर्दीच्या वेळी दुर्घटना घडू शकते, तर अनेक फलाटांवरील जुने पूल अरुंद आहेत, ते कित्येक वर्षांपूर्वी बांधले आहेत. गाड्यांची संख्या वाढली, डब्यांची संख्या वाढली, प्रवाशांची संख्या तर अनेक पटींनी वाढली. त्यामुळे हे पूल आता अपुरे पडू लागले आहेत. दोन गाड्या एकाचवेळी आल्या तर पुलांवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या गर्दीचा अंदाज घेऊन पुलांची संख्या वाढवायला हवी होती; मात्र तसे झाले नाही.

रेल्वेने नव्या फलाटांवर अनेक ठिकाणी सरकते जिने बसवले आहेत; मात्र तेही अनेकदा बंद असतात. पश्‍चिम रेल्वेच्या जोगेश्‍वरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल येथील तर मध्य रेल्वेवरील कुर्ला, करी रोड, चिंचपोकळी, मशीद बंदर या स्थानकांवर जेमतेम पाच-सहा फूट रुंद पूल आहेत. तसेच येथून दोन्ही दिशांनी प्रवासी ये-जा करीत असतात. तेथेही दुर्घटना घडू शकतात.

पुलावर फेरीवाले, भिकारी
महापालिकेने दादर, अंधेरी रेल्वेस्थानकांवर पन्नास ते साठ फूट रुंद पूल बांधले आहेत; मात्र त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान आहे. त्याखेरीज भिकारी, गर्दुल्ले हेही पुलांवर वाट अडवून बसलेले असतात. त्यांच्यावर क्वचित कारवाई होते. कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा पुलावर येतात. त्यांना कायमस्वरूपी अटकाव करण्यात रेल्वे पोलिस अपयशी ठरले आहेत.

उपाय
- अरुंद फलाटांची रुंदी वाढवण्याची गरज
- पुलांची रुंदी वाढवण्याची आवश्‍यकता
- फलाटांना जोडणाऱ्या पुलांची संख्या वाढवणे अपरिहार्य
- सरकत्या जिन्यांची संख्या वाढवण्याची आवश्‍यकता

Web Title: mumbai news railway bridge issue