मुंबईत लोकल ठप्प, एक्स्प्रेसही रोखल्या; तुरळक दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

यापूर्वी अर्धनग्न आंदोलन
यापूर्वी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. रेल्वेने नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातले नियम बदलल्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत, 2 हजार तरुणांनी अर्ध नग्न प्रदर्शन करुन सरकारचा निषेध केला होता. पंतप्रधान एकीकडे स्किल इंडियाची भाषा करतात, पण मग आमच्यासारखे ऑलरेडी स्किल अवगत असलेले युवक रेल्वे का नाकारते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

मुंबई : रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या गाड्या दादर स्थानकाच्या पुढे येत नसल्याने सीएसटी स्थानकापर्यंत एकही गाडी पोहोचलेली नाही

विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. अप्रेटिंस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत.

अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा पवित्रा घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थी आज मुंबईत आले आहेत. त्यांनी सकाळी सकाळीच रेल्वे बंद पाडल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या. त्यांची भेट घेतली, पण गोयल यांनी अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलक विद्यार्थ्यांचा आहे.

20 टक्के कोटा रद्द करण्याची मागणी
पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

पोलिसांचा लाठीचार्ज
अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे ठप्प केल्याने प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. मोठ्या संख्येत अॅप्रेंटिसचे विद्यार्थ्यी रेल्वे रुळावर आले मात्र आरपीएफ किंवा पोलीसांची संख्या खूपच तोगडी होती. थोड्यावेळाने पोलिसांनी रेल्वेरुळावर उतरुन विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याने, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

यापूर्वी अर्धनग्न आंदोलन
यापूर्वी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. रेल्वेने नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातले नियम बदलल्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत, 2 हजार तरुणांनी अर्ध नग्न प्रदर्शन करुन सरकारचा निषेध केला होता. पंतप्रधान एकीकडे स्किल इंडियाची भाषा करतात, पण मग आमच्यासारखे ऑलरेडी स्किल अवगत असलेले युवक रेल्वे का नाकारते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Web Title: Mumbai news Railway exam stuedents agitation apprenticeship piyush goyal