रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार उघड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - मेल-एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर कारवाई करण्यास मध्य रेल्वेने सुरवात केली आहे. चेंबूर येथे बेकायदा सॉफ्टवेअरद्वारे ई-तिकीट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रेल्वेच्या पथकाने अटक केली.

चेंबूर येथील अमर महलजवळ रमेश इलेक्‍ट्रिकल या दुकानातून आरक्षित तिकिटे देण्यात असल्याची माहिती रेल्वेच्या संयुक्त पथकाला मिळाली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), वाणिज्य विभाग आणि दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितरीत्या पाळत ठेवली. रमेश इलेक्‍ट्रिकलमधील दोन जण जादा पैसे घेऊन मेल-एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या आरक्षित तिकिटांची विक्री नियो या बेकायदा सॉफ्टवेअरद्वारे करत असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. संदीप शर्मा आणि शिवकुमार गुप्ता हे जादा पैसे घेऊन तिकीट विक्री करत असताना अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली. आरोपींनी लगेचच गुन्ह्याची कबुली दिली.

चेंबूर येथील आणखी काही तिकीट विक्रेत्यांनी अशाच प्रकारे बेकायदा तिकीट विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. आरोपींनी 41 वैयक्तिक आयडी वापरून तिकीट बुकिंग केले होते. या कारवाईमध्ये एक लाख 15 हजार रुपयांची 42 ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

Web Title: mumbai news railway ticket black market