मध्य रेल्वेला पावसाचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेची दाणादाण उडाली. पावसाचा पहाटेपासूनच जोर होता. त्यामुळे दोन स्थानकांत पाणी साचले. हार्बरच्या मानखुर्द स्थानकात रुळांखालील खडी वाहून गेली. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आणि दिवसभरात तब्बल 80 फेऱ्या रद्द आणि 180 फेऱ्यांना लेटमार्क लागला. 

मुंबई - पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेची दाणादाण उडाली. पावसाचा पहाटेपासूनच जोर होता. त्यामुळे दोन स्थानकांत पाणी साचले. हार्बरच्या मानखुर्द स्थानकात रुळांखालील खडी वाहून गेली. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आणि दिवसभरात तब्बल 80 फेऱ्या रद्द आणि 180 फेऱ्यांना लेटमार्क लागला. 

मंगळवारी पावसामुळे मध्य रेल्वेला अनेक तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. पाणी साचण्याबरोबरच लोकल, इंजिन व सिग्नलमध्येही बिघाड झाला. हीच परिस्थिती बुधवारीही होती. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात रुळांवर पाणी आल्याने सिग्नल यंत्रणेत तांत्रिक अडचण निर्माण झाली. पहाटे चारपासून दोन तास ही समस्या होती. त्यामुळे मेन लाईनवरील लोकलचा खोळंबा झाला. पावसाचा जोर आणि त्यातच झालेला बिघाड यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिरा धावत होत्या. त्याचवेळी हार्बरच्या माहीम स्थानकातही पाणी साचल्याने सीएसटी ते अंधेरी हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांना फटका बसला. या दोन घटनांतून मध्य रेल्वे सावरते तोच हार्बरच्या मानखुर्द स्थानकाजवळ सकाळी 8.30च्या सुमारास रुळांखालील खडी वाहून गेली. त्यामुळे सीएसटी ते मानखुर्दपर्यंत धावणाऱ्या लोकलच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अर्ध्या तासानंतर हा मार्ग पूर्ववत झाला; पण लोकलच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात आले आणि त्यामुळे हार्बरवरील लोकलही उशिरा धावू लागल्या व काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यापाठोपाठ आसनगाव ते वासिंददरम्यानही सकाळी 10च्या सुमारास मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. या मालगाडीचे इंजिन कसाऱ्याहून मागवण्यात आले. त्यात दोन तासांहून अधिक वेळ गेला. त्यामुळे लोकल फेऱ्यांबरोबरच मेल, एक्‍स्प्रेसनाही फटका बसला. या सर्व गोंधळामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बरवर रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 80 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. लोकलच्या 180 फेऱ्यांना उशीर झाला. 

पश्‍चिम रेल्वेही विस्कळित 
संध्याकाळी 6.45च्या सुमारास पश्‍चिम रेल्वेही विस्कळित झाली. लोअर परळ ते एल्फिन्स्टनदरम्यान झाडाची छोटी फांदी ओव्हरहेड वायरवर पडली. यात मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळही उठले. फांदी पडल्याने ओव्हरहेड वायरच्या वीजपुरवठ्यात तांत्रिक समस्या निर्माण झाली. अखेर अर्ध्या तासानंतर ही समस्या सोडवून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. 

Web Title: mumbai news rain Central Railway