राजधानीचा दिमाख आणखी वाढला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मुंबई-नवी दिल्लीदरम्यान राजधानी एक्‍स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचा मानस आहे. त्यामुळे दर्जाही वाढेल.
- मुकुल जैन, विभागीय व्यवस्थापक, पश्‍चिम रेल्वे

मुंबई - सर्वोच्च सेवा देण्यासाठी अग्रेसर असलेल्या पश्‍चिम रेल्वेने मुंबई-नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये अत्याधुनिक बदल करून नवीन झळाळी दिली आहे. स्वर्ण प्रकल्प योजनेंतर्गत यापूर्वी मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील शताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सेवा दिली आहे.

राजधानी एक्‍स्प्रेसच्या सर्व डब्यांचा बाह्य भाग आकर्षक पद्धतीने रंगवण्यात आला आहे. त्यामुळे आता डब्यांवरील धूळ व अस्वच्छता दिसणार नाही. या एक्‍स्प्रेसचे प्रवेशद्वार, प्रसाधनगृह, खिडक्‍या, छत आदींना नवीन रंग देण्यात आला आहे; तर आरामदायक खुर्च्या, रंगसंगती साधणारे पडदे, रात्रीचे दिवे, डब्यांमध्ये आकर्षक रंगसंगती करण्यात आली आहे. त्यामुळे या एक्‍स्प्रेसच्या 23 डब्यांचे रूपडे पालटले आहे. एका डब्याच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील सांस्कृतिक वारसा आदींची चित्रेही लावण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. जेवणासाठी विमानातील फूडप्रमाणे ट्रॉली आहे. विशेष म्हणजे यापुढे जेवण तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरऐवजी विजेचा वापर करण्यात येणार आहे. ही गाडी गुरुवार (ता. 8)पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

Web Title: mumbai news rajdhani express