मुंबई - शहरात 2002, 2003 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांतील आरोपी साकीब नाचण याची बुधवारी (ता.22) सुटका झाली. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला पाच वर्षांपासून ठाणे तुरुंगातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा पाच महिने आणि 13 दिवसांनी कमी करण्यात आली.
मुंबई सेंट्रल, विलेपार्ले, मुलुंड स्थानकात बॉंबस्फोट झाले होते. 2002 मध्ये मुंबई सेंट्रल येथे झालेल्या स्फोटात 25 जखमी झाले, तर 2003 मध्ये विलेपार्ले येथील स्फोटात 1 ठार तर 25 जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांना अटक केली होती. मुलुंडमध्ये झालेल्या स्फोटाचा मास्टरमाईंड म्हणून नाचणचे नाव उघडकीस आले होते. तो वादग्रस्त "सिमी' संघटनेचा पदाधिकारी होता. "पोटा' आणि शस्त्र कायद्याखाली त्याला दोषी ठरवण्यात आले होते. ठाण्यातील पडघा येथील काही तरुणांना त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते.
. . . . .
|