बारा देशांत पाठवा स्वस्त दरात पार्सल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - पोस्टाच्या ग्राहकांना स्वस्त दरात आंतरराष्ट्रीय पार्सल ट्रॅकिंगचा पर्याय देणारी सेवा सोमवारपासून मुंबईतील पोस्टाच्या कार्यालयांत सुरू झाली. इंटरनॅशनल ट्रॅकिंग पॅकेट सर्व्हिस (आयटीपीएस) या पोस्टाच्या नव्या सेवेला अखेर मुहूर्त मिळाला. स्कॅनिंग कोडमधील तांत्रिक चुकांमुळे ही सेवा काही दिवसांपासून रखडली होती. एका वरिष्ठ पोस्टमनच्या हस्ते या सेवेची सुरवात टपाल खात्याच्या दादरमधील कार्यालयात करण्यात आली. परळ, चिंचबंदर, मांडवी, बी. पी. लेन या ठिकाणच्या कार्यालयांतही ही सेवा सुरू झाली.

श्रीनिवास नागोला हे एका ई-कॉमर्स कंपनीसोबत व्यावसायिक म्हणून काम करतात. प्रत्येक महिन्याला आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी त्यांचा संबंध पोस्टाशी येतो. सोमवारी दादर कार्यालयात आयटीपीएस सेवेचा वापर करून आंतरराष्ट्रीय पार्सल बुक करणारे हे पहिले ग्राहक ठरले. त्यांनी सांगितले, की माझा मनगटी घड्याळांचा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक देशांत मी प्रत्येक महिन्याला सरासरी 40 ते 50 आंतरराष्ट्रीय पार्सले बुक करतो; पण आतापर्यंत पार्सल ट्रॅकिंगची सुविधा मिळत नव्हती. पोस्टाची रजिस्टरची सेवा आहे; पण त्यात ट्रॅकिंगचा पर्याय नाही. या पर्यायामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देणे शक्‍य होईल, असे नागोला म्हणाले. अडीच वर्षांपासून मी व्यवसायासाठी पोस्टाच्या सेवेचा वापर करतो आहे. आयटीपीएस सेवेमुळे माझ्या व्यवसायाला फायदाच होईल, असे त्यांनी सांगितले.

पोस्टाने आयटीपीएस सेवेद्वारे 12 देशांत आंतरराष्ट्रीय पार्सले पोचवण्याचा पर्याय ग्राहकांना देऊ केला आहे. पहिल्या 100 ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठी 330 रुपये आयटीपीएस सेवेसाठी घेण्यात येत आहेत. पुढच्या दर 100 ग्रॅमसाठी अतिरिक्त पैसे घेण्यात येतील. मुंबईसह देशभरात या सेवेची अंमलबजावणी होणार असल्याचे डाक दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय सेवांसाठीच्या पोस्टाच्या सध्याच्या सेवांमधील ही सर्वांत स्वस्त अशी सेवा आहे.

Web Title: mumbai news Send to twelve countries at a cheap price parcel