भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक उपाय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - वाहतूक पोलिसांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या विभागाच्या वतीने सीसीटीव्ही आणि ई-चलानची पद्धती सुरू केली आहे, अशी माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. यामध्ये ई-मेल आयडीचा पर्यायही वाहनचालकांसाठी ठेवण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले.

मुंबई - वाहतूक पोलिसांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या विभागाच्या वतीने सीसीटीव्ही आणि ई-चलानची पद्धती सुरू केली आहे, अशी माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. यामध्ये ई-मेल आयडीचा पर्यायही वाहनचालकांसाठी ठेवण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले.

वाहतूक पोलिस विभागात काम करणाऱ्या सुनील टोके यांनी ऍड. दत्ता माने यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी न्या. आर. एम. सावंत आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वाहतूक पोलिस पैसे उकळतात, असा आरोप याचिकादाराने केला आहे.

या विभागाचे सहपोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्यामार्फत केलेल्या प्रतिज्ञापत्रात विविध योजना आणि अंमलबजावणीची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यानुसार वर्षभरात महत्त्वाच्या मार्गांवर सुमारे पाच हजार 208 सीसीटीव्ही कॅमेरे शहर-उपनगरांत लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण वाहतूक कार्यालयातून होत असते. सहआयुक्त कार्यालयातूनही हे काम केले जाते. त्यामुळे प्रत्येक मिनिटाचे अपडेट्‌स यामध्ये तपासले जातात, असा दावा विभागाने केला आहे. अनेक भागांत ई-चलान पद्धती आणण्यात आली असून, त्यामुळे रोखीने व्यवहार केला जात नाही. सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते आणि ई-चलान पाठवले जाते. त्यामार्फत दंड वसूल केला जातो. अनेक पायलट भागांमध्ये पोलिसांकडेच कॅमेरा दिलेला आहे. त्यामुळे पारदर्शकता राहून गैरप्रकार होत नाहीत, असेही सांगण्यात आले. न्यायालयाने या पद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. संबंधित ई-मेल आयडीची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. आतापर्यंत 13 पोलिसांवर विभागीय कारवाई केल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

Web Title: mumbai news Several measures to prevent corruption