तीर्थक्षेत्र विकासांतर्गत शिर्डीचा कायापालट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

वायफाय, कॅन्सर रुग्णालय, फूट एनर्जी आदी प्रकल्प राबविणार

वायफाय, कॅन्सर रुग्णालय, फूट एनर्जी आदी प्रकल्प राबविणार
मुंबई - तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शिर्डीला एक हजार 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीसह शिर्डी संस्थानच्या वतीने शिर्डीचा कायापालट होणार आहे. शहरात मोफत "वायफाय', घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. राष्ट्रपुरुषांच्या मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय (वॅक्‍स म्युझियम) तयार केले जाणार आहे, अशी माहिती साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त एक ऑक्‍टोबर ते 18 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. हावरे म्हणाले, 'समाधी शताब्दी काळात सुमारे 10 हजार 500 साईसेवकांची फौज तयार केली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी "आयएएस' अकादमी उभारण्यात येणार आहे. विरारच्या साईधाम ट्रस्टचे विश्‍वस्त काशीनाथ पाटील यांनी साईपालखी निवारा येथील 32 कोटी रुपयांच्या दोन इमारती नुकत्याच दिल्या असून, तेथे प्रशिक्षणार्थ्यांची शिक्षण, भोजन आणि निवास व्यवस्था निःशुल्क केली जाणार आहे. दर्शनरांगेत चालण्याच्या प्रक्रियेतून ऊर्जा निर्माण करणारा देशातील पहिला अत्याधुनिक "फूट एनर्जी' प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या ऊर्जेच्या माध्यमातून सुरवातीला दर्शनरांगेतील विद्युत उपकरणांना वीजपुरवठा होईल. कर्करोगाच्या उपचारांसाठी कॅन्सर शताब्दी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या सहयोगाने 125 कोटी रुपये खर्चून शंभर खाटांचे रुग्णालय एक वर्षात उभारण्यात येईल. साईंच्या दर्शनाला येणाऱ्या देशविदेशातील भाविकांना ऑनलाइन सेवा मिळावी, यासाठी शहरात एक ऑगस्टपासून मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. स्वच्छ आणि सुंदर शिर्डीसाठी नगरपालिकेला दरमहा 25 लाख रुपयांचा निधी संस्थानमार्फत दिला जात आहे. शहरात दररोज निर्माण होत असलेल्या सुमारे 20 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून निर्माण होणारा गॅस आणि विजेचा उपयोग मंदिरासाठी केला जाणार आहे.''

साईसृष्टी, तारांगण, स्टार गेझिंग गॅलरी...
निमगाव-कोऱ्हाळेच्या 21 एकर जागेत साईसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साईबाबांच्या आयुष्यातील घटना ऑडिओ, व्हिडिओ, ध्वनी, रोषणाईच्या माध्यमातून दाखविल्या जाणार आहेत. याशिवाय साईतारांगणाची निर्मिती करण्यात येणार असून, ते पाहण्यासाठी बहुस्तरीय "थ्री-डी'ची व्यवस्था असेल. याशिवाय 25 टेलिस्कोप असलेली "स्टार गेझिंग गॅलरी' उभारण्यात येणार असून, येथे विद्यार्थ्यांना ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करता येणार आहे. तसेच सायन्स पार्कही साकारले जाणार आहे.

Web Title: mumbai news shirdi transformation under pilgrimage development