विम्याच्या बोनसचे प्रलोभन दाखवून गंडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - विम्यावर बोनसची रक्कम मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 30 हजार रुपये हस्तगत केले. त्यांनी मुलुंड परिसरातील एका डॉक्‍टरला तीन लाखांचा गंडा घातला होता. 

मुंबई - विम्यावर बोनसची रक्कम मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 30 हजार रुपये हस्तगत केले. त्यांनी मुलुंड परिसरातील एका डॉक्‍टरला तीन लाखांचा गंडा घातला होता. 

राकेश शिंदे, रमेश उगले, मुरलीधर देशमुख, कुमार मालुसरे, आकाश चिखले, राजेश मगदुम, संजय मानकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, भुसावळ येथील नागरिकांना फसवल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्याकडे विम्याचा डेटा, नोंदणीसंबंधातील कागदपत्रे आढळली आहेत. मुलुंड येथे राहणारे डॉ. राजेश्‍वर हरिश्‍चंद्र यांनी खासगी विमा कंपनीकडून पॉलिसी घेतली होती. त्याचे तीन हप्ते त्यांनी भरले होते. सप्टेंबर 2017 मध्ये कोरगावकर नामक व्यक्तीने त्यांना फोन केला. विमा पॉलिसीवर एक लाख 46 हजारांचा बोनस मिळणार आहे. त्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे या व्यक्तीने डॉ. राजेश्‍वर यांना सांगितले. त्यानंतर ऑक्‍टोबर 2017 नंतर प्रोसेसिंग फी आणि हप्त्याच्या नावाने सुमारे 24 हजार रुपये वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत उकळले. बरेच दिवस उलटूनही बोनसची रक्कम न मिळाल्याने डॉ. राजेश्‍वर यांनी फोनवरून संबंधितांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. काही दिवसांनी पुन्हा या टोळीतील एकाने त्यांना 32 लाखांचा बोनस लवकरच मिळेल; त्यासाठी तीन लाख 15 हजारांची प्रोसेसिंग फी भरा असे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून डॉक्‍टरांनी त्याने दिलेल्या खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर डॉ. राजेश्‍वर यांना संशय आल्याने त्यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. 

Web Title: mumbai news Show the temptation for insured bonuses