कल्याण, झारखंडमधील बेपत्ता तरुणांमध्ये साम्य

कल्याण, झारखंडमधील बेपत्ता तरुणांमध्ये साम्य

'एटीएस'च्या तपासातील निष्कर्ष; इराकमध्ये नेणारा ट्रॅव्हल एजंट एकच
मुंबई - "इसिस' या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा संशय असलेले कल्याणमधील चार तरुण आणि इराकमधून बेपत्ता झालेल्या झारखंडमधील दोन तरुणांमध्ये अनेक गोष्टींबाबत साम्य असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तरुणांच्या गटाचा ट्रॅव्हल एजंटही एकच असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील हा एजंट "एटीएस'च्या रडारवर आहे.

झारखंडमधील रायपूर येथील दोन तरुण जानेवारीत बगदाद येथील धार्मिक स्थळाला भेट देण्याच्या बहाण्याने गेले होते. नंतर त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. विशेष म्हणजे कल्याणमधील अरिब माजिद, अमन तांडेल, फहाद शेख आणि शहीम टंकी या तरुणांमध्ये आणि झारखंडमधून बेपत्ता झालेल्या तरुणांमध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. या दोन तरुणांना आणि कल्याणधील तरुणांना इराकला पाठवणारा ट्रॅव्हल एजंट एकच आहे. याप्रकरणी एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

एटीएसचे पथक रायपूरला चौकशीसाठी गेले होते; पण त्यापूर्वीच या दोन तरुणांचे कुटुंबीय तेथून बेपत्ता झाले होते. धार्मिक स्थळांना भेट देण्याच्या नावाखाली (जियारत व्हिसा) या तरुणांचा व्हिसा काढला जातो. त्यासाठी अत्यंत कमी कागदपत्रांची गरज असते. जानेवारीत हे दोन तरुण बगदादमधील सूफी अब्दुल कादिर जिलानी यांच्या मदरशाला भेट देण्याच्या नावाखाली इराकला गेले होते. त्यांच्यासोबत इतर प्रवासीही इराकला गेले होते; पण तेथे गेल्यानंतर ते तेथून बेपत्ता झाले.

कल्याणमधील अरिब माजिद, अमन तांडेल, फहाद शेख व शहीम टंकी हे 19 ते 25 वयोगटातील तरुण 2014 मध्ये इराक येथील तीर्थक्षेत्राला भेट देण्याच्या नावाखाली घरातून बाहेर पडले होते; परंतु ते सीरियाला गेले आणि इसिसमध्ये सामील झाले होते. त्यातील अरिब माजिद नोव्हेंबर 2014 मध्ये भारतात परतल्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. उर्वरित तिघे अजूनही इसिसमध्ये आहेत.

माजिदने चौकशीत इसिसच्या बाजूने युद्धात भाग घेतल्याचे आणि दोन वेळा जखमी झाल्याचे सांगितले होते.

75 जणांचे समुपदेशन
इसिसमध्ये सामील होण्यासाठी माथी भडकवलेल्या राज्यातील 75 जणांचे समुपदेशन करून एटीएसने त्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. विशेष म्हणजे त्यात आठ महिलांचाही समावेश आहे. इसिसच्या कारवाया सुरू झाल्यानंतर सोशल मीडियाचा वापर करून अनेक तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार सुरू करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com