मुलीच्या जन्मदाखल्यातून जन्मदात्याचे नाव वगळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई - मुलीच्या जन्मदाखल्यात दुरुस्ती करून मिळावी, तसेच मुलीच्या जन्मदाखल्यातून जन्मदात्याचे नाव काढून टाकावे, या मागणीसाठी एका अविवाहित मातेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपण अविवाहित असल्याने मुलीच्या जन्मदाखल्यावर जन्मदात्याचे नाव नको आहे, त्याऐवजी आपले नाव लावावे, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे. रुग्णालयात दाखल करून घेताना आणि जन्मदाखला तयार करताना या महिलेने केलेला मूळ अर्ज उच्च न्यायालयात सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला आहे.

बोरिवलीत राहणाऱ्या या महिलेने नोव्हेंबर 2014 मध्ये एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर लगेच मुलीचा जन्मदाखला मिळवला. उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेला महिलेने दाखल्यासाठी केलेला मूळ अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. अर्ज करताना या महिलेने वैवाहिक स्थिती या रकान्यात काय लिहिले होते, हे पाहायचे आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.

जन्मदाखल्यासाठीच्या अर्जात महिलेने "विवाहित' असे लिहिले होते; पण आता मुलीच्या वडिलांसोबत वाद निर्माण झाल्यामुळे मुलीच्या जन्मदाखल्यातून त्यांचे नाव वगळायचे आहे, असा युक्तिवाद तिचे वकील उदय वारुंजीकर यांनी केला.

सिंगल पॅरेन्ट किंवा अविवाहित, कुमारी मातेला आपल्या पाल्याला केवळ स्वतःचे नाव देण्याचा अधिकार आहे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्याचे दाखलेही प्रतिज्ञापत्रासोबत उच्च न्यायालयात सादर करण्यात आले.

Web Title: mumbai news Skip the birth name of the girl's birthplace