एसआरए अधिकाऱ्यांची 'पीएफ'बाबत हलगर्जी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) सुमारे 100 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा "पीएफ' भरण्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल 10 ते 12 वर्षे कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कमच भरली नसल्याने पीएफ कार्यालयाने "एसआरए'ला नोटीस बजावली आहे.

"एसआरए'चा गाडा हाकण्यासाठी प्रशासनाने स्थापनेपासून विविध पदांवर काही कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले. हे कर्मचारी 10 ते 12 वर्षांपासून "एसआरए'च्या कामाला गती देत आहेत. त्यांना मिळणारे मानधनही अत्यल्प असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे वजा झाले नाहीत. त्यामुळे 10 ते 12 वर्षांतील पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांनी एकरकमी भरावेत, अशी सक्ती अधिकारी करीत आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अपुरे असल्याने एकरकमी पैसे भरणे शक्‍य नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत.

"एसआरए'ची उलाढाल सुमारे तीन हजार कोटींची असतानाही प्रशासनाचा कारभार सुरळीत राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या "पीएफ'साठी 56 लाख रुपये प्रशासन भरू शकत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पीएफ कार्यालयानेही या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम तातडीने भरण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

...तर एसआरएचे बॅंक खाते सील!
कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम तातडीने भरली जावी, याकरिता पीएफ कार्यालयाकडून एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेण्यात येणार आहे. पीएफची रक्कम न भरल्यास एसआरएचे बॅंक खाते सील करू, असा इशाराही पीएफ कार्यालयाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: mumbai news sra officer pf