तारांकित हॉटेलांना अतिरिक्त एफएसआय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - मुंबईत नव्याने उभ्या राहणाऱ्या तारांकित हॉटेलांना त्यांच्या परिसरातील पोच रस्त्याच्या लांबीनुसार 100 ते 200 टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याची शिफारस राज्य सरकारने महापालिकेला केली आहे. तसेच, तारांकित हॉटेलांसाठी भूखंडाच्या क्षेत्रफळाची अटही रद्द करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. हा प्रस्ताव प्रशासनाने सुधार समितीच्या पटलावर मांडला असून, तो बुधवारी (ता. 28) राखून ठेवला. राज्य सरकारच्या पर्यटन धोरणानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी पंचतारांकित हॉटेलांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी फोर स्टार आणि पंचतारांकित हॉटेलांसाठी भूखंड किमान अडीच हजार चौरस मीटर आणि थ्री स्टार हॉटेलांना भूखंड किमान एक हजार चौरस मीटरचा असणे बंधनकारक होते; मात्र ही अट राज्य सरकारने रद्द केली आहे. तारांकित उपाहारगृहांसाठी किमान क्षेत्रफळाच्या भूखंडाची अटही रद्द झाली आहे.
Web Title: mumbai news star hotel fsi