एका गुणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थिनीला दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - दहावीच्या परीक्षेत तब्बल 95 टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण होऊनही एका विषयात एक गुण अधिक मिळावा, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उत्तरपत्रिका तपासताना एसएससी मंडळाने अतितांत्रिक दृष्टिकोन ठेवू नये, असा सल्लाही न्यायालयाने दिला आहे. 

मुंबई - दहावीच्या परीक्षेत तब्बल 95 टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण होऊनही एका विषयात एक गुण अधिक मिळावा, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उत्तरपत्रिका तपासताना एसएससी मंडळाने अतितांत्रिक दृष्टिकोन ठेवू नये, असा सल्लाही न्यायालयाने दिला आहे. 

उत्तम आकलन शक्ती आणि बुद्धिमत्ता असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीला मागील (सन 2016) शालांत परीक्षा निकालामध्ये 95 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, निकालपत्रिका पाहिल्यावर शास्त्र विषयात अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले नाहीत, असे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने मंडळाकडे संबंधित विषयाची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी मागितली. या उत्तरपत्रिकेमध्ये तिच्या दोन प्रश्‍नांची उत्तरे बरोबर देऊनही त्याला पुरेसे गुण देण्यात आलेले नाही, असे तिच्या निदर्शनास आले. त्यापैकी एका प्रश्‍नाबाबत मंडळाने सहमती दिली आणि वाढीव गुण मंजूर केले. मात्र, दुसऱ्या प्रश्‍नामध्ये योग्य उत्तर नाही, असे कारण देऊन गुण देण्यास नकार दिला. याविरोधात तिने वडिलांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. बी. आर. गवई आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. ज्या प्रश्‍नाबाबत वाद निर्माण झाला होता तो प्रश्‍न होता की, वर्गामध्ये ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून काय करायला हवे. या प्रश्‍नाचे विद्यार्थिनीने दिलेले उत्तर होते की, वर्गावर नियंत्रक ठेवावे, विद्यार्थ्यांनी मोठा आवाज केला तर त्यांना शिक्षा करावी किंवा विद्यार्थ्यांना एखादे काम द्यावे ज्यामुळे ते व्यस्त होतील. मात्र, ही उत्तरे मंडळाने नामंजूर केली होती. संबंधित प्रश्‍नाचे निर्धारित तांत्रिक उत्तर, वर्गात आवाज होऊ नये म्हणून मोठ्याने बोलू नये, असे होते. त्यामुळे विद्यार्थिनीला गुण मिळू शकत नाही, असे मंडळाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. मात्र, मंडळाने असा अतितांत्रिक दृष्टिकोन ठेवू नये, त्याउलट विद्यार्थी जर वेगळ्या प्रकारे विचार करून उत्तर देत असतील तर त्याची विधायक दखल घ्यावी, असे खंडपीठाने सुचविले आणि संबंधित उत्तरासाठी योग्य ते गुण देण्याचे आदेश दिले.

Web Title: mumbai news student court ssc result