विद्यापीठ, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यातील शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आल्याने राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुरेशा उपाययोजना कराव्यात. याकरिता विद्यापीठ व महाविद्यालयांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महिन्याभरात सरकारला सादर करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले आहेत.

काही वर्षांमध्ये राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यासह रॅगिंग, लैंगिक शोषण, हत्या आदी गंभीर घटनाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठे व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाची असतानाही काही संस्थांतील परिसरात, वसतिगृहे, ग्रंथालये, उपाहारगृहे आदी ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याचे आढळले आहे, असे वायकर यांनी अपर मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतसाठी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांतील शैक्षणिक संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र देणे, सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे आदी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही वायकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: mumbai news Take care of the safety of the students