लष्कराच्या अधिकाऱ्यांना रेल्वेकडून तांत्रिक प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेतील एल्फिन्स्टन रोड, करी रोड व आंबिवली या तीन पादचारी पुलांचे काम लष्कराकडे सोपवण्यात आले आहे. युद्धकाळात पूल बांधण्याचा अनुभव असलेल्या लष्कराच्या पथकाला प्रथमच रेल्वेच्या पादचारी पुलांचे काम देण्यात आले आहे. या कामात त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पश्‍चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक विभागाने लष्कराच्या पथकाला नुकतेच रेल्वेच्या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे पुलांच्या बांधकामांना गती मिळेल.

या प्रशिक्षण सत्रात रेल्वेचे 13 अधिकारी आणि सहा पर्यवेक्षक सहभागी होते. पश्‍चिम रेल्वेचे सहायक विभागीय व्यवस्थापक (इन्फ्रा) कन्हैया झा व विभागीय व्यवस्थापक (कार्यकारी विभाग) व्ही. के. श्रीवास्ताव यांनीही यात भाग घेतला. लष्कराचे मेजर अभिजित महापात्रा यांच्या नेतृत्वाखाली लष्कराचे दोन अधिकारी व 13 जवानांनी हे प्रशिक्षण घेतले. रेल्वेकडे असलेल्या पायाभूत सुविधा, बांधकाम, घाट बांधकाम, रेल्वेची भौगोलिक वाहतूक स्थिती, लोहमार्ग ओलांडताना घ्यावयाची खबरदारी, एल्फिन्स्टन यार्डची रूपरेषा व नामकरण, मालाची वाहतूक कशा पद्धतीने करावी, खोदकाम करताना तारांची कशी काळजी घ्यावी, वाहतूक आणि ओव्हरहेड ब्लॉक्‍स, 25 किलोवॉट ओव्हरहेड वायर असलेल्या परिसरात काम करताना घ्यावयाची खबरदारी, सिग्नल यंत्रणा याबाबत रेल्वेकडून तांत्रिक माहिती देण्यात आली.

Web Title: mumbai news technical training by railway to Army officers