ठाण्यातील सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी 'आरोग्यदूत'

श्रीकांत सावंत
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

ठाणे शहरातील प्रत्येक सफाई कामगाराच्या आरोग्याची तपासणी या उपक्रमाच्यामाध्यमातुन केली जाणार आहे. पुढील टप्प्यात शहराच्या अन्य भागात त्याचे आयोजन होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शहरातील डाॅक्टर आणि सामाजिक संस्थांनीही पुढे येण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने कॅसबर आॅगस्ट्रीन यांनी केले. 

ठाणे : स्वच्छ भारत अभियनाच्या माध्यमातून देशभरामध्ये स्वच्छतेसाठी नागरिकांकडून पुढाकार घेतला जात असला तरी आयुष्यभर कचऱ्याचे ढिगारे साफ करणारे आणि नाल्यांमध्ये उतरून कोणत्याही साहित्याशिवाय स्वच्छता करणाऱ्यांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केले जाते. ठाणे शहरातील बड्या गृहसंकुलांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी या कामगारांसाठी आरोग्यदूत होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या कामगारांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांच्यामधील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांच्या उपचाराचीही जबाबदारी घेतली आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा पोखरण रोड नंबर एकच्या परिसरामध्ये पंधरा दिवसांपुर्वी झाला तर शनिवारी हिरानंदानी मेडोज क्लब परिसरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 75 कामगारांची तपासणी पुर्ण झाली. शहरातील अन्य भागामध्येही या संस्थेकडून सफाई कामगारांना आरोग्याची जबाबदारी घेऊन त्यांना उपचार पुरवणार आहेत. 

सफाई कामगारांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये शहरातील स्वच्छता करावी लागत असून त्यांना स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्याचाही पुरवठा केला जात नाही. मास्क, हातमोजे, गमबुट, गटार साफ करण्यासाठीचे यंत्र याशिवाय काम करणाऱ्या कामगारांना अत्यंत वाईट अवस्थेमध्ये गटारांमध्ये उतरून काम करावे लागते. त्यांच्या या कामामुळे त्यांना संसर्गाचा धोका निर्माण होत असून अनेक दुर्धर आजारांनी त्यांना ग्रासण्याची शक्यता असते. परंतु या कामगारांच्या आरोग्याकडे स्वत: ही दुर्लक्ष करतात तर प्रशासकिय यंत्रणाही त्यांना कोणतीही आरोग्याची सुविधा देत नाही. त्यामुळे अकाली मृत्यू ओढवण्याचीही वेळ या कामगारांवर येते. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांत सामाजिक काम करणाऱ्या ठाणे सिटीझन फाऊंडेशन संस्थेने पुढाकार घेत या सफाई कामगारांच्या आरोग्य सेवा पुरवण्याच निर्णय घेण्यात आला. शहरातील विविध भागातील सफाई कामगारांना एकत्रित करून शहरातील अत्यंत तज्ञ डाॅक्टरांकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार पोखरण रोड नंबर एक, हिरानंदानी मेडोज या भागातील शंभराहून अधिक कामगारांची तपासणी करण्यात आली आहे. या सफाई कामगारांची रक्त तपासणी, कान, नाका, घसा, दातांची तपासणी, फिजीओथेरपी सारख्या उपचार पध्दतींचा अवलंब करण्यात आला. तर त्यांना आवश्यक स्वच्छतेच्या साहित्यांचा पुरवठा यावेळी करण्यात आला होता. 

सफाई कामगारांचा आनंदोत्सव...
शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून गांधीनगर हजेरी शेड भागातील कामगाऱ्यांनी हिरानंदानी येथील कार्यक्रमास हजेरी लावली. त्यावेळी हे आरोग्य तपासणी शिबीर नसून हा एक आनंदोत्सव आसल्याचा अनुभव त्यांना आला. एकाबाजुला डाॅक्टरांकडून तपासणी केली जात होती तर दुसरीकडे या कामगारांच्या मनोरंजनासाठी या भागातील कलाकार आपली कला सादर करत होते. वसंत विहार, सिध्दांचल काॅम्प्लेक्स, लोक पुरम, लोकउपवन, हिरानंदानी मेडोज, हाईड पार्क, तुलसीधाम, शुभारंभ, हॅप्पी व्हाॅली, अकॅमी ओझोन आणि हवा मंडल या भागातील स्वच्छता कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले. ठाणे सिटीझन फाऊडेशन, रोटरी क्लब आॅफ स्काय लाईन, हिरानंदानी मेडोज वेल्फेअर असोसिएशन आणि इनरव्हील क्लब या संस्थांनी या उपक्रमाला मदत केली. डाॅ. रहेश रविंद्रन (फिजिशन) डाॅ. अलोक मोदी, डाॅ कमल घनशामानी, डाॅ. दिशिता बुधलानी, डाॅ. प्रवीण गोव्हर उपस्थित राहणार आहेत. तर त्यांना सुकुमार साखरदंडे, मधुर साखरदांडे, डाॅ. अजित गोरे सहकार्य करणार आहे. 

ठाण्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोजन...
ठाणे शहरातील प्रत्येक सफाई कामगाराच्या आरोग्याची तपासणी या उपक्रमाच्यामाध्यमातुन केली जाणार आहे. पुढील टप्प्यात शहराच्या अन्य भागात त्याचे आयोजन होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शहरातील डाॅक्टर आणि सामाजिक संस्थांनीही पुढे येण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने कॅसबर आॅगस्ट्रीन यांनी केले. 

Web Title: mumbai news: thane