ठाण्यात गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड

श्रीकांत सावंत
गुरुवार, 6 जुलै 2017

विनयभंग करणाऱ्या तरूणाला थेट पोलीस ठाण्याची वाट 

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील अलोक हॉटेल परिसरातून घरी जाणाऱ्या तरुणीला तेथील एका रिक्षा चालकाने अश्लिल शेरेबाजी करून तिची छेडछाड केली. याचा जाब विचारायला गेलेल्या या तरुणीला या रिक्षाचालकाने धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केला. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर गस्तीवर आलेल्या बीट मार्शलकडे तक्रार करून या तरुणीने या रिक्षाचालकाला थेट पोलिस ठाण्याचा रस्ता दाखवला.

पोलिसांनी या प्रकरणी सिकंदर शेख या रिक्षाचालकास अटक केली असून त्याच्या विरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती ठाणे नगर पोलिसांकडून देण्यात आली. 

ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणारी तरूणी सायंकाळी कामावरून घराकडे निघाली होती. त्यावेळी अलोक हॉटेल परिसरात एका रिक्षाचालकाने तीच्याकडे पाहत अश्लिल शेरेबाजी आणि हावभाव केले. याचा राग आलेल्या या तरुणीने या रिक्षाचालकास थेट जाब विचारला. तर त्याने तिला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केला.

रिक्षाचालक सिकंदर शेख (27) असे या तरूणाचे नाव असून तो राबोडी परिसरात राहणार आहे. रिक्षाचालकाला प्रतिकार करणाऱ्या या तरूणीला या भागात गस्तीवर असलेल्या बीट मार्शल दिसले आणि तीने त्यांच्याकडे तक्रार केली. या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन ठाणे नगर पोलिस ठाण्यात नेले. तरूणीच्या तक्रारीवरून रिक्षा चालकास अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहीत ठाणे नगर पोलिसांकडून देण्यात आली. ठाण्यात महिनाभरात तरुणीचा विनयभंग, रिक्षातून फेकण्याचा घटना घडल्याने रिक्षाचालकांचा हिंसक आणि गुन्हेगारी वृत्ती वाढल्यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचा वातावरण निर्माण होऊ लागले आहे. 

Web Title: mumbai news thane rickshaw driver molests girl