तिकीट तपासनीसांचा गणवेश रेल्वे बदलणार

संतोष मोरे
शनिवार, 23 डिसेंबर 2017

मुंबई - सुटाबुटात आणि अनेकदा पांढऱ्या गणवेशातच दिसणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे रूप आता पालटणार आहे. येत्या वर्षात तिकीट तपासनीस व ट्रेन अधीक्षक डिझायनर जॅकेटमध्ये दिसतील.

मुंबई - सुटाबुटात आणि अनेकदा पांढऱ्या गणवेशातच दिसणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे रूप आता पालटणार आहे. येत्या वर्षात तिकीट तपासनीस व ट्रेन अधीक्षक डिझायनर जॅकेटमध्ये दिसतील.

तिकीट तपासनीस व ट्रेन अधीक्षक अनेक वर्षांपासून विशिष्ट डिझाईन केलेले गणवेश घालत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गणवेशाबाबत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात उल्लेख केला होता. याची सुरुवात शताब्दी, राजधानी व दुरांतो या लांब पल्ल्याच्या गाड्यांपासून केली जाणार आहे. त्यानंतर अन्य गाड्यांतील तिकीट तपासनीस व ट्रेन अधीक्षकांना नवीन गणवेश देण्यात येईल, असे समजते.

तिकीट तपासनीस, ट्रेन अधीक्षक यांचा गणवेश बदलण्याबाबत नेमलेल्या समितीने सर्व कर्मचाऱ्यांचा गणवेश एकसमान व एकाच रंगाचा असावा, अशी शिफारस अहवालात केली आहे. ती रेल्वे बोर्डाने मंजूर केली असून, त्यानुसार नवीन गणवेश तयार करण्यात आला आहे.

केंद्रीय रेल्वे बोर्डाने नवीन गणवेश देण्याबाबत रेल्वेच्या सर्व विभागीय महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो आदी लांब पल्ल्याच्या गाड्यांतील तिकीट तपासनीस व ट्रेन अधीक्षक यापुढे नवीन गणवेशात दिसतील.

असा असेल गणवेश
पांढरा व पूर्ण बाह्यांचा शर्ट, त्यावर राखाडी कोट व त्याच्या दोन्ही बाह्यांवर तीन सोनेरी रंगाच्या पट्ट्या असतील. ट्रेन अधीक्षकांसाठी असा गणवेश आहे. तिकीट तपासनीसांसाठी राखाडी रंगाच्या कोटवर छातीवरील खिशावर दोन सोनेरी रंगाच्या पट्ट्या आणि त्यावर भारतीय रेल्वेचे बोधचिन्ह आणि राखाडी पॅंट असेल. भारतीय रेल्वेचे बोधचिन्ह असलेली लाल टाय, राखाडी जॅकेटवर पुढील बाजूला बोधचिन्ह आणि दोन्ही खिशांवर सोनेरी पट्ट्या असा गणवेश आहे.

Web Title: mumbai news ticket checker uniform change