ट्विटर, फेसबुक नको रे बाबा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

लालूही ॲक्‍टिव्ह 
माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवही ट्विटरवर ॲक्‍टिव्ह असतात. भाजपचे जवळपास सर्वच मंत्री, नेते ट्विटरवर आहेत; पण माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी अद्याप ट्विटरवर नाहीत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ट्‌विटरचा वापर केल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे अनेक नेत्यांनी ट्‌विटरवर ‘टीव टीव’ सुरू केली; मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजही सोशल मीडियापासून दूर आहेत. यापुढेही ते ट्‌विटर किंवा फेसबुक वापरणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना फेसबुक, ट्‌विटर वापरण्याबाबत अनेक वेळा त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले होते; मात्र त्यांनी अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. प्रत्येक काळाचे एक माध्यम असते. सोशल मीडिया या काळातील माध्यम आहे. त्याच्या वापरात सातत्य गरजेचे आहे. त्याचा गांभीर्याने वापर व्हायला हवा, अशी उद्धव यांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वत: ट्‌विटरवर ॲक्‍टिव्ह असतात; मात्र उद्धव यांना त्यात अजिबात रस नाही. यापुढे ते कधी सोशल मीडियावर ॲक्‍टिव्ह होतील, याची शक्‍यता कमीच असल्याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सुरुवातीपासूनच ट्विटरचा वापर करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सोशल मीडियाचा राजकीय वापर केला. स्वत: मोदी ट्विटरवर ॲक्‍टिव्ह असतात. त्यांची प्रत्येक सेल्फी ट्विटरवर शेअर केली जाते. सोशल मीडियाचा आवाका पाहून अनेक राष्ट्रीय नेत्यांनी यात रस घेतला. केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार, नगरसेवक, पक्षांचे पदाधिकारीही ट्विट करत असतात. काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुकवर एन्ट्री केली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे त्यांनी शेअर केलेले व्यंगचित्रही गाजले. 

Web Title: mumbai news twitter facebook Uddhav Thackeray