ऑनलाइन सट्ट्याप्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - ग्रॅंट रोड येथील उच्चभ्रू सोसायटीतील घरात छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी घोड्यांची शर्यत व मेन नावाच्या ऑनलाइन मटक्‍याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी मीलन दमानिया (53) व समीर दमानिया (50) या दोघांना अटक केली आहे. ते दोघेही ताडदेव येथील रहिवासी आहेत. मुंबई, बंगळूर व म्हैसूर येथील दलालांमार्फत ऑनलाइन पद्धतीने हा सट्टा चालवण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

टेलरचा व्यवसाय करणारे मीलन आणि समीर ऑनलाइन सट्ट्यातही सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-2 च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी ग्रॅंट रोड येथील मातृमंदिर या इमारतीतील एका फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. तेव्हा घोड्यांची शर्यत व मेन नावाच्या मटक्‍यावर लावण्यासाठी पैसे स्वीकारत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून बेटिंगच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या, दोन संगणकाच्या हार्ड डिस्क व मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.

आरोपींच्या संगणकातील डॉसबॉक्‍स नावाचे सॉफ्टवेअरच्या साह्याने हा ऑनलाईन सट्टा घेतला जात असे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचे एजंट मुंबई, म्हैसूर व बंगळूर या ठिकाणी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

प्राथमिक तपासात आरोपींकडे 69 हजार 510 रुपयांच्या घोड्यांच्या शर्यतीच्या व 44 हजार 990 रुपयांच्या मेन मटक्‍याच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या सापडल्या आहेत; पण ही रक्कम आरोपींकडे सापडली नसल्यामुळे त्यांचे व्यवहारही ऑनलाइन पद्धतीने होत असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा 66 सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 44 व 12 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: mumbai news two arrested in online beating