डॉ. लहानेंविरोधातील दोन अवमान याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जाणीवपूर्वक, नियमबाह्य पद्धतीने सवलती दिल्याचा ठपका ठेवत जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने काढलेल्या दोन अवमान याचिका आता उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

ऍन्जिओग्राफी करण्यासाठी भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र त्यांना 30 दिवसांहून अधिक काळ रुग्णालयात ठेवण्यात आले. या कालावधीत त्यांना नियमबाह्य पद्धतीने विविध सुविधा पुरवण्यात आल्या, असा ठपका विशेष न्यायालयाने लहाने यांच्यावर ठेवला आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लहाने यांच्याविरोधात विशेष न्यायालयात तक्रार केली आहे. या तक्रारीवरून काढण्यात आलेल्या दिवाणी आणि फौजदारी या अवमान याचिका पुढील सुनावणीसाठी उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. न्या. एस. एस. केमकर आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे बुधवारी या याचिकांवर सुनावणी झाली. या याचिका एकत्रितपणे सुनावणीला घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. लहाने यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची परवानगी वकील मनीषा जगताप यांनी या वेळी मागितली. याचिकेवर पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.

Web Title: mumbai news two Contempt petition on dr. lahane