'एएनसी'त लवकरच दोन श्‍वान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

मुंबई - अमली पदार्थांचा शोध लावण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकात (एएनसी) लवकरच दोन श्‍वान दाखल होणार आहेत. त्यांच्या देखभालीसाठी चार प्रशिक्षकही नेमण्यात येणार आहेत. 1989 मध्ये एएनसीची स्थापना झाली. तेव्हापासून या विभागासाठी प्रशिक्षित श्‍वानांची मागणी होत होती; मात्र ती लाल फितीत अडकली होती. अमली पदार्थ लपवण्यासाठी तस्कर विविध क्‍लृप्त्या लढवतात. श्‍वानांच्या मदतीने अशा लपवलेल्या अमली पदार्थांचा शोध घेणे शक्‍य असते; मात्र श्‍वान उपलब्ध नसल्याने एएनसीच्या पथकाला अनेकदा हात हलवत परतावे लागत होते. या पार्श्‍वभूमीवर या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत हे श्‍वान एएनसीच्या पथकात दाखल होणार आहेत. या श्‍वानांना हाताळण्यासाठी पोलिस दलातील 21 इच्छुक प्रशिक्षकांची मुलाखत घेऊन त्यापैकी चौघांची निवड करण्यात आली आहे. एका श्‍वानासाठी दोन प्रशिक्षक असतील. या श्‍वानांना राजस्थानातील टेकनपूर येथील बीएसएफ अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. मुंबई पोलिस दलातील इतर श्‍वानपथकांबरोबर या श्‍वानांना ठेवण्यात येणार आहे.
Web Title: mumbai news two dongs in anc