विद्यापीठाच्या निकालाचा वाजणार बोऱ्या

किरण कारंडे/तेजस वाघमारे
शुक्रवार, 16 जून 2017

केवळ पाच टक्केच उत्तरपत्रिकांची तपासणी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार फटका

केवळ पाच टक्केच उत्तरपत्रिकांची तपासणी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार फटका
मुंबई - गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मोठा गाजावाजा करत ऑनलाईन पेपर तपासणीची घोषणा केली खरी; मात्र या घोषणेची पूर्तता करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. विद्यापीठाकडे आलेल्या सुमारे 22 लाख उत्तरपत्रिकांपैकी केवळ पाच टक्केच उत्तरपत्रिकांची आज जून महिन्याच्या मध्यावर ऑनलाईन तपासणी झाली असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे यंदा विद्यार्थी आणि पालकांना विद्यापीठाचा ऑनलाईन गोंधळ अनुभवावा लागणार आहे.

विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे पेपर ऑनलाईन तपासण्याची घोषणा कुलगुरू देशमुख यांनी ऐन परीक्षांच्या तोंडावर केली. यामुळे या उपक्रमाची तयारी करण्यास प्रशासनाला पुरेसा वेळ मिळाला नाही.

विद्यापीठाने घाईघाईत घेतलेल्या या निर्णयाचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. नवीन विद्यापीठ कायद्यानुसारही परीक्षेनंतर निकाल 45 दिवसांत लागणे अपेक्षित असते; मात्र अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन 45 दिवस झाले तरी विद्यापीठाचा एकाही विभागाचा निकाल जाहीर होऊ शकलेला नाही. ऑनलाईन पेपर तपासणीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीने उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण केले आहे; मात्र पेपर तपासणीच्या कामाला अद्यापही वेग आलेला नाही. पेपर तपासणीसाठी अनेक मॉडरेटरचे लॉग-इन तयार झालेले नाहीत. यातच ऑनलाईन पेपर तपासणीसाठी लागणारा वेळही अधिक असल्याने मॉडरेटरर्स त्रस्त झाले आहेत. ऑफलाईन पद्धतीने दिवसभरात 30 हून अधिक पेपरची तपासणी होत होती; मात्र ऑनलाईन पद्धतीमध्ये केवळ पाच ते सहा पेपरची तपासणी होत असल्याने आजअखेर केवळ पाच टक्के पेपरची तपासणी पूर्ण झाल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. याच गतीने पेपरची तपासणी होत राहिल्यास निकाल लागण्यास डिसेंबर महिना उजाडू शकतो, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष 5 जूनपासून सुरू झाले आहे. एकाही परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने पुढील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कधी राबवायची, असा प्रश्‍न विद्यापीठातील विभागप्रमुखांना पडला आहे. त्यामुळे निकालाशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे वर्ग सुरू करण्याचा विचार विभागप्रमुख करत आहेत. पदवी अभ्यासक्रमांचे निकाल रखडल्याने पदवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

ऑनलाईन पेपर तपासणीचे काम वेगाने सुरू आहे; पण तरीही विद्यापीठाचे निकाल उशिराने लागतील. निकाल वेळेत लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- दीपक वसावे, परीक्षा व पुनर्मूल्यांकन विभागाचे प्रभारी संचालक

विद्यापीठाने एकाच वेळी सर्व परीक्षांच्या ऑनलाईन पेपर तपासणीची घाई केली आहे. पेपर तपासणीचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. याचा वेग वाढवून निकाल वेळेत लावावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करू.
- संतोष गांगुर्डे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष

Web Title: mumbai news university result