मुंबई विद्यापीठाकडून घाईघाईने "निकाल'

नेत्वा धुरी
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

तीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

तीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
मुंबई - न्यायालयाच्या दणक्‍याला घाबरून परीक्षा भवनातून पटापट निकाल जाहीर झाले खरे; परंतु सुमारे 30 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून निकाल घाईने लावण्याचा प्रकार मुंबई विद्यापीठाने केला आहे. राखीव निकाल या आठवड्यात जाहीर केला जाईल, असा विद्यापीठाचा दावा असला, तरी राखीव निकालाच्या विलंबासाठी हरवलेल्या उत्तरपत्रिका हे महत्त्वाचे कारण असून, त्या शोधून काढताना परीक्षा भवनाची चांगलीच दमछाक होत आहे.

महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल 31 ऑगस्टपर्यंत जाहीर करून विद्यापीठ मोकळे झाले; परंतु या परीक्षातील बहुतांश विद्यार्थ्यांना निकाल मिळण्याबाबत संयम बाळगण्याचा संदेश मुंबई विद्यापीठाने दिला. निकाल संकेतस्थळावर दिसत नसून, तुमचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे, असा संदेश संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दिसत आहे.

संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच सापडत नसल्याने निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे परीक्षा विभागातील सूत्रांनी सांगितले.
कोणत्या प्राध्यापकाकडे नेमक्‍या चुकीच्या विषयाच्या उत्तरपत्रिका गेल्या आहेत, हे शोधताना परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. या कामात मुळात प्रत्येक प्राध्यापकाने त्याच्याकडील माहिती देणे अपेक्षित होते. अद्याप काही प्राध्यापकांनी ही माहिती न दिल्याने ही माहिती शोधायला परीक्षा विभागाला जास्त वेळ लागत आहे.

Web Title: mumbai news university result