उरण-जेएनपीटी रस्त्याची दुरवस्था 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

उरण - जेएनपीटी आणि उरणला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-५४ (सध्याचा एनएच-३४८ए) वर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना बोट चालवत असल्याचा अनुभव येत आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने विनासायासपणे जात असली तरी लहान वाहने आणि दुचाकीस्वारांना येथून जाताना कसरत करावी लागते.

रस्त्याच्या दुतर्फा अनेक कंटेनर यार्ड आणि सीएफएससाठी भराव झाल्यामुळे रस्त्याच्या कडेचा भाग हा उंच झाला आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता खोल झाला आहे. त्यामुळे या भरावातील सगळे पाणी या रस्त्यावर येते. रस्त्याच्या कडेला पाणी वाहून जाण्यासाठी गटार नाही. त्यामुळे पाणी रस्त्याच्या सखल भागात साचते. तीन-चार दिवसांत उरण तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाल्याने या रस्त्याची अवस्था नदीसारखी झाली होती. जासई शंकर मंदिर आणि जे कुमार कंपनीजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. जवळपास एक किलोमीटर लांब पाणी वाहत असते. त्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. 

हा रस्ता जेएनपीटीला जोडला असल्यामुळे येथून रोज हजारो अवजड वाहने धावतात. त्यातच हा रस्ता म्हणजे अपघातांचे केंद्रबिंदू ठरला आहे. सध्या जेएनपीटीला जोडणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. 

पाणी तुंबते त्या भागात रस्ता रुंदीकरणासाठीच्या जमिनीचे अधिग्रहण झालेले नाही. जासई भागातील शेतकऱ्यांचा या रस्ता रुंदीकरणाला विरोध आहे. त्यामुळे एनएचएआय तेथे काम करू शकत नाही. तरीही लवकरात लवकर  पाण्याचा निचरा करण्याचे अन्य उपाय योजण्यात येतील. 
- प्रशांत फेगडे, व्यवस्थापक, एनएचएआय, पनवेल.

Web Title: mumbai news Uran-JNPT road