सदोष ब्रेथ ऍनालायझरमुळे वाहनचालक निर्दोष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - 'ब्रेथ ऍनालायझर' उपकरण सदोष असल्याचे आढळून आल्यामुळे मोटारसायकलस्वाराला महानगर दंडाधिकाऱ्यांना निर्दोष सोडावे लागले. दर तीन महिन्यांनी हे उपकरण निर्जंतुक करण्याची गरज असूनही वाहतूक पोलिस सलग आठ महिने ते वापरत होते. रक्ताचे नमुनेही त्यांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले नसल्याचा मोटारसायकलस्वाराचा दावा मान्य करत दंडाधिकाऱ्यांनी त्याला दिलासा दिला.

वाहतूक पोलिसांनी 3 डिसेंबर 2015 रोजी मुंबईत जागोजागी "ड्रंक अँड ड्राइव्ह' मोहीम राबवली होती. आझाद मैदान पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत राजेश नाखवा याला दारू पिऊन मोटारसायकल चालवत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ब्रेथ ऍनालायझर वापरून नाखवा यांची तपासणी केल्यावर त्यांनी जास्त मद्यप्राशन केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.

बॅलॉर्ड पियर येथील महानगर दंडाधिकारी ए. डी. पलासपगार यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीत नाखवा यांच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल आणि अन्य पुरावे सादर केले नसल्याचे निरीक्षण दंडाधिकाऱ्यांनी नोंदवले. 13 मे 2015 रोजी हे उपकरण निर्जंतुक केल्याची बाब नाखवा यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्यांची निर्दोष सुटका केली.

Web Title: mumbai news vehicle driver innocent by breath analyser