पुनर्प्रक्रिया केलेले पाणी आग विझवणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - दक्षिण मुंबईतील कुलाबा मलजल प्रकल्पांतर्गत पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरून हायड्रंटचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असलेले ब्रिटिशकालीन फायर हायड्रंट पुनरुज्जीवित केले जाणार आहेत.

मुंबई - दक्षिण मुंबईतील कुलाबा मलजल प्रकल्पांतर्गत पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरून हायड्रंटचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असलेले ब्रिटिशकालीन फायर हायड्रंट पुनरुज्जीवित केले जाणार आहेत.

मुंबईत तेलशुद्धीकरण कारखाने, रासायनिक खत कारखाने आणि इतर औद्योगिक उद्योगांमुळे अग्निशमन दलाला वेळोवेळी रासायनिक अपघातांना तोंड द्यावे लागते. रासायनिक प्रकारचे अपघात झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘हॅजमॅट’ वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. अग्निशमन दलात नव्या यंत्रणा हव्यात; पण त्याचा वापर, नवी यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक अग्निशमन दलातील जवानांना दाखविण्यात आली आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रस्तावावर आक्षेप घेतला. दक्षिण मुंबईत पालिका मुख्यालय, रिझर्व्ह बॅंक, स्टॉक एक्‍स्चेंज आदी कार्यालये आहेत. अनेक वर्षांपासून तिथली अग्निशमन दलाची गाडी बंद अवस्थेत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अग्निशमन दलाने त्याची दखल घ्यावी, अशी सूचना नगरसेवकांनी प्रशासनाला केली. मुलुंडमध्ये कारला आग लागल्यानंतर एका तासाने अग्निशमन दलाची गाडी आली. इतर देशांच्या तुलनेत मुंबई पालिका पाच वर्षे मागे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. जोगेश्‍वरी परिसरात एकाच महिन्यात तीन वेळा आग लागली होती. तेथील हायड्रंट बंद असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंधेरीतून पाणी आणावे लागले. त्यामुळे मुंबईतील हायड्रंट पुनरुज्जीवित करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी केली.  

‘हॅजमॅट’चे प्रशिक्षण 
‘हॅजमॅट’ गाडी खास केमिकल न्यूक्‍लिअरसाठी आहे. प्रायोगिक तत्त्वावर ती गाडी घेण्यात येणार आहे. सहा महिन्यांत अग्निशमन दलाच्या ताफ्यात गाडी दाखल होईल. त्याच दरम्यान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. अग्निशमन दलाचे अधिकारी केमिस्ट्री झालेले असतात. त्यांना गाडी हाताळणे सोपे जाईल. 

Web Title: mumbai news water fire