वेस्टर्न एक्‍स्प्रेस वे होणार पेव्हर ब्लॉकमुक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंबर कसली असून, पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्ग पेव्हर ब्लॉकमुक्त होणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत.

महामार्गाच्या खेरवाडी जंक्‍शन ते दहिसर या दरम्यानच्या 25 कि.मी.पर्यंतची देखभाल एमएमआरडीएकडून केली जाते. याच महामार्गावर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो 7 मार्गाचे कामही एमएमआरडीएकडून सुरू आहे. मार्गावरील खड्डे भरण्याचे आणि दुरुस्तीचे काम करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. गतवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील खड्डे भरण्यासाठी वेळेत कंत्राटदार मिळाला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे ठरवले आहे. मार्गावरील सर्व 10 लेनमधील खड्डे भरण्यासाठी आणि रस्ते चकाचक करण्याकरिता 33 कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

या कामाच्या निविदा काढण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दुरुस्तीच्या कामावेळी महामार्गावर काही ठिकाणी बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॅकही काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या ठिकाणी पडणारे खड्डे आणि वाहतुकीचा होणारा खोळंबाही दूर होणार आहे.

Web Title: mumbai news western express way paver block free