महिलांचा 13 जुलैला राज्यव्यापी मूक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात घोषणा; सरकारला जाब विचारणार

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात घोषणा; सरकारला जाब विचारणार
नवी मुंबई - कोपर्डी बलात्कारप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून दोन महिन्यांत पीडितेला न्याय मिळवून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी 13 जुलैला महिलांचा राज्यव्यापी मूक मोर्चा काढणार, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी केली.

वाशी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात तटकरे बोलत होते. कोपर्डी बलात्कारप्रकरणी राज्य सरकार गंभीर नाही. महिलांवरील अत्याचार कमी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तटकरे म्हणाले, की सध्या सतत राजकीय भूकंप होणार अशा वल्गना केल्या जात आहेत. यात शिवसेनेचे नेते आघाडीवर आहेत. मात्र, अद्याप भूकंप झालेला नाही. अशा भूकंपांना राष्ट्रवादी कॉंग्रेस घाबरत नाही. मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत.

या वेळी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार कोटी वृक्ष लागवडीवरून शिवसेना - भाजपच्या मंत्र्यांवर टीका केली. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या नेत्यांनी लावलेली झाडे कशी जगतील, असा टोला त्यांनी लगावला. कर्जमाफीच्या योजनेतील जाचक अटींमुळे ही योजना आहे की कर्जवसुली योजना, हेच कळत नसल्याची टीकाही पवार यांनी केली.

Web Title: mumbai news women Statewide silent rally on July 13