
Mumbai Fraud : विमानाच्या प्रवासाची तारीख बदलताना ऑनलाईन लाखोंची फसवणुक
मुंबई - विदेशात जाण्यासाठीच्या विमानाची तारीख बदलणे पवईतील एका वृद्धाला महागात पडले आहे. तारीख बदलण्याच्या निमित्ताने त्यांच्या बँक खात्यातून दहा लाखाहून अधिक रक्कम सायबर फसवणूक करून काढण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी पवई पोलिसांकडे धाव घेत गुन्ह्याची नोंद केली आहे.
78 वर्षीय तक्रारदार हरवंद सिंग छापरा हे त्यांच्या पत्नीसह पवईत राहतात. त्यांना 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अज्ञात क्रमांकावरून फोन आला. ज्याने स्वतःचे नाव राहुल असे सांगत तो टर्किश एअरलाइनचा एजंट असल्याची ओळख सांगितली. त्यानंतर त्याने छापरा यांना तुम्ही जी मुंबईहून अमेरिकेला जाण्याची तिकीट बुक केली आहे त्याबाबत आपल्याला काही तक्रार आहे का अशी विचारणा केली. त्यावर छापरा यांनी हो म्हणत प्रवासाची तारीख बदलायची असल्याचे सांगितले.
ते ऐकल्यावर कॉलर ने त्यांना तारीख बदलायची असल्यास त्याची फी भरावी लागेल असे सांगत छापरा यांचा बँक अकाउंट नंबर आणि डेबिट कार्ड क्रमांक घेतला. त्यांना 5 हजार रुपये भरायला सांगत एअरलाइन्सचा मेसेज येईपर्यंत फोन चालू ठेवण्यास सांगितला. हा फोन छापरा यांनी 15 मिनिटे चालू ठेवत समोरून काहीच प्रतिसाद नसल्याने नंतर कट केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एकूण 10 लाख 15 हजार रुपये डेबिट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर इसम त्यांना सतत फोन करत होता मात्र त्यांनी तो उचलला नाही. आणि त्यांच्या बँकेत जाऊन खाते फ्रीज करून पोलीस ठाण्यात तक्रार केली.