अनलॉकच्या पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

प्रवासादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येतंय. मात्र सरकारच्या आदेशांकडे मुंबईकर दुर्लक्ष करताना दिसतायत. मुंबईत आज असाच एक प्रकार घडलाय. 

मुंबई: राज्यात तब्बल ४ वेळा लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. मात्र यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होतेय म्हणून सरकारनं काही नियम शिथिल करून आता राज्यात 'मिशन बिगिन अगेन'ला सुरुवात केली आहे. यानुसार आता सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे. प्रवासादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येतंय. मात्र सरकारच्या आदेशांकडे मुंबईकर दुर्लक्ष करताना दिसतायत. मुंबईत आज असाच एक प्रकार घडलाय. 

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जतहून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला होता. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. या नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचंही भान राहिलं नाही. तसंच कल्याणहून निघालेल्या लोकलमध्ये एका सीटवर एक प्रवासी बसू शकेल असा नियम आहे. तरीही इतर नागरिकांनी उभ्यानं प्रवास केला. 

हेही वाचा: मनसेचा बडा पदाधिकारी म्हणतोय "राऊतसाहेब... तर मी तुमच्या पाया पडेन", वाचा नक्की झालंय काय

"या गाडीमध्ये काही कंत्राटदारांची माणसं आहेत तर सामान्य नागरिकही या गाडीमध्ये चढत आहेत. त्यामुळे आम्हाला बसायला जागाही मिळत नाही मग सोशल डिस्टंसिंग कसं ठेवणार? या गाडीत कोणाची तपासणीही होत नाही, कृपया प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं", अशी मागणी काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे.  

डोंबिवलीतही घडला असाच प्रकार: 

एसटीमधून प्रवास करण्यासाठी डोंबिवलीत नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र एसटी डोळ्यासमोर दिसल्यानंतर नागरिकांना कोरोनाचंही भान राहिलं नाही. एसटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. 

हेही वाचा: मुंबईकरांनो, तुमचा लाडका वडापाव तुमच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज...

एकूणच काय तर अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवले. त्यामुळे आता  मुंबईकरांना कोरोनाची भीती राहिली नाहीये का असाच सवाल उपस्थित होतोय.  

mumbai people are not following social distancing while travelling 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai people are not following social distancing while travelling