मुंबई पोलिसांच्या ‘तिसऱ्या डोळ्या’स संपाची बाधा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

सीसीटीव्ही कर्मचारी संपावर

मुंबई ः राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असतानाच, मुंबईच्या सुरक्षेपुढे एक वेगळेच आव्हान निर्माण झाले आहे. संपूर्ण मुंबईवर नजर ठेवणारा ‘तिसरा डोळा’च अधू झाला आहे. मुंबईतील पोलिस नियंत्रण कक्षातील सीसीटीव्हीचे ऑपरेटर संपावर गेले आहेत. या कक्षात ४३ कर्मचारी दिवसभरात चार पाळ्यांमध्ये काम करीत असत. संपानंतर आता फक्त १० ऑपरेटरच कार्यरत आहेत. त्यामुळे फक्त दोन पाळ्यांमध्येच काम चालत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

‘२६-११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत सुमारे सहा हजार सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले होते. ती यंत्रणा उभारणीचे काम ‘एल अँड टी’ या कंपनीला देण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल-दुरुस्तीचे काम ‘सीएमएस’ कंपनीला देण्यात आले होते. या सर्व यंत्रणेच्या साह्याने मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पाचव्या मजल्यावरील नियंत्रण कक्षातून मुंबईवर नजर ठेवली जाते. ते काम करण्यासाठी मुख्यतः निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन वर्षांपासून वेतनवाढ मिळालेली नाही. पगारही वेळेत मिळत नाही. त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीविषयीही प्रश्न आहेत. याबाबत संबंधितांना कळवूनही दखल घेण्यात आली नसल्याने मंगळवारपासून या नियंत्रण कक्षातील ४३ जणांनी संप पुकारला आहे.  आता या मुख्य नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा हाताळण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षांतील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. परिणामी चार पाळ्यांमध्ये चालणारे काम आता दोन पाळ्यांवर आले आहे. 

मुंबईतील गुन्ह्यांची उकल होण्यात हल्ली सीसीटीव्हीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. गुन्हा घडलेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रफितींद्वारे संबंधित आरोपीचा माग काढण्याचे काम हेच सीसीटीव्ही ऑपरेटर करत असतात. सुमारे १२०० हून अधिक गुन्हे सोडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रफितींचा वापर केला. 

हा ऑपरेटर काम करत असलेल्या खासगी कंपनीचा अंतर्गत मुद्दा आहे. त्याचा सुरक्षेवर परिणाम होणार नाही, याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. 
- प्रणय अशोक, उपायुक्त व प्रवक्ते, मुंबई पोलिस 

नजरजाल
मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणेत जागतिक दर्जाचे व उच्च क्षमता असलेले एक हजार ४९२ कॅमेरे, २० थर्मल कॅमेरे, चार हजार ८५० बॉक्‍स कॅमेरे यांचा समावेश आहे. शहरातील एक हजार ५१० संवेदनशील ठिकाणी हे कॅमेरे बसविले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police CCTV staff on strike