मुंबई पोलिसांची दोन कोव्हिड केंद्रे बंद; रुग्ण संख्या घटल्याने निर्णय

अनिश पाटील
Thursday, 24 September 2020

गेल्या काही आठवड्यात मुंबई पोलिस दलातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला असून त्यांच्यासाठी असलेली दोन कोव्हिड केंद्रे तात्पुर्ती बंद करण्यात आली आहेत.

मुंबई : गेल्या काही आठवड्यात मुंबई पोलिस दलातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला असून त्यांच्यासाठी असलेली दोन कोव्हिड केंद्रे तात्पुर्ती बंद करण्यात आली आहेत.

शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या मुंबई पोलिस दलासाठी  दिलासादायक बातमी आहे. या दलातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह येथील पोलिस जीमखाना येथील केंद्र आणि मरोळ येथील एक कोव्हिड केंद्र तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही केंद्र तयारीत असून  कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या  वाढला, तरी तात्काळ ती पुन्हा सुरू करण्यात येतील. 
उपलब्ध आरोग्य स्त्रोतांचा वापर योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येत आहे. त्यामुळे या केंद्रांची सध्या गरज नसल्यामुळे  बंद करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

 

केंद्रांमुळे मोठा आधार
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक बाधीत रुग्ण मुंबई पोलिस दलात होते. त्यामुळे बाधीत पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोव्हिड हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्याच्याही पुढे जाऊन मुंबई पोलिसांनी 726 खाटांची क्षमता असलेले चार केंद्रे उभारण्यात आली. मुंबईतील वाढती रुग्णांच्या संख्यमुळे सामान्य रुग्णालयांवर मोठ्याप्रमाणात ताण आला होता. अशा काळात मुंबई पोलिसांनी उचललेल्या पावलामुळे अनेक पोलिसांना याद्वारे तात्काळ उपचार मिळाले. परिणामी सध्या मुंबई पोलिस दलातील सक्रिय रुग्णांची संख्या फार कमी आहे.

70 टक्के पोलिस कामावर रुजू
मुंबई पोलिस दलातील पाच हजार 831 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 80 जणांचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत पाच हजार 170 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील 70 टक्के पोलिस कामावर रुजूही झाले आहेत. मे-जून महिन्यात   कोरोनाबाधीत पोलिसांचे प्रमाण सर्वाधीक होते. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कमी आल्याचे पहायला मिळाले.

टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात आळ्या; महापालिकेने घेतली तत्काळ दखल

राज्यात चिंता वाढली
 सध्या राज्य पोलिस दलातील ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे व सांगली येथील रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे 78 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊ सुरू झाल्यापासून ऑगस्ट महिन्यात सर्वाधित 54 मृत्यू झाले होते. आतापर्यंत राज्यात 21 हजार 827 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 18 हजार 158 पोलिसांना कोरोनावर मात केली आहे. बुधवारपर्यंत 234 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Police closes two covid centers