Mumbai : डोंबिवलीतील 'त्या' इमारतीवर पोलिस बंदोबस्तात कारवाई; पालिकेकडून करण्यात येत होती चालढकल

Mumbai News
Mumbai News

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील गावदेवी मंदिर जवळील बगिचाचे आरक्षण असलेल्या जागेत बेकायदा सात मजली इमारत उभी राहीली आहे. इमारतीचे बेकायदा बांधकाम सुरु आहे हे माहित असूनही पालिका प्रशासन हे बांधकाम रोखण्यास अपयशी ठरले होते. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत पालिका अधिकारी ही कारवाई सातत्याने पुढे ढकलत होते.

शहरातील इतर इमारतींवर कारवाई होते, मग या इमारतीवर का नाही. या इमारतीला कोणाचे अभय मिळत आहे. याविषयी दै. सकाळने सातत्याने अनधिकृत बांधकामांविषयी वृत्त प्रसारित केले आहे. अखेर बुधवारी पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात या बेकायदा इमारतीवर कारवाई सुरु केली आहे. गेले अनेक महिने रखडलेली कारवाई अखेर सुरु झाल्याची चर्चा यावेळी पालिका कर्मचाऱ्यांमध्ये होती.

कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत. पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. मात्र ही कारवाई दिखावू स्वरुपाची असते. इमारतीचा केवळ काही भाग पाडून बांधकाम तसेच सोडले जाते. त्यानंतर पुन्हा इमारतीचे बांधकाम करुन व्यावसायिक त्या इमारतीतील घरांची विक्री देखील करत आहेत.

अनधिकृत बांधकाम कारवाई पालिका प्रशासनाने हाती घेतली असली तरी काही ठराविक बांधकामे पाडली जातात, तर काही इमारतींना मात्र अभय दिले जाते. शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांविषयी दै. सकाळने विविध वृत्तांत सातत्याने आवाज उठविला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा येथील इमारतीवरील कारवाईसाठी भूमाफियांनी रस्ता अडवून देखील पालिका अधिकारी अधिकचा ताफा अडवून कारवाई करतात. मात्र पूर्वेतील गावदेवी येथील इमारतीवरील कारवाई साठी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण अधिकारी देत होते. तब्बल सहा ते सात वेळा हा पोलिस बंदोबस्त पालिका अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे मागूनही तो दिला जात नव्हता. यामुळे या इमारतीवर कारवाई होऊ नये यासाठी वरतून दबाव येत असल्याची चर्चा सुरु झाली होती.

वास्तूविशारद संदिप पाटील यांनी या इमारतीवर कारवाई करण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी पालिका प्रशासनाने इमारतीवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पोलिसांना विचारणा केली असता अखेर पोलिस बंदोबस्त मिळाला.

त्यानुसार सकाळी 11 च्या दरम्यान टिळकनगर पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील, सुहास गुप्ते, भारत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 25 कामगार, 8 ब्रेकर, कटर, पोकलेन, जेसीबी यांच्या सहाय्याने इमारतीचे पाडकाम सुरु करण्यात आले आहे. इमारतीचा बहुतांश भाग हा पाडण्यात येणार असल्याचे यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पालिकेचा ताफा घटनास्थळी पोहोचताच प्रभाग अधिकाऱ्यांवर या इमारतीवर कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती काही घटकांकडून करण्यात आली. परंतू न्यायालयाचे आदेश असल्याने पालिकेचे तसेच पोलिसांचे हात बांधले गेले. अहवाल सादर करण्यासाठी ही कारवाई करावी लागेल असे देखील यावेळी काही कर्मचाऱ्यांकडून बोलले जात होते.

"पोलिस बंदोबस्त मिळताच गावदेवी मंदिर जवळील बेकायदा इमारती वर कारवाईची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यात येत आहे. ही कारवाई दिवसभर सुरु राहील."

- भरत पाटील, प्रभाग क्षेत्र अधिकारी

"आरक्षित जागांवर असलेली बेकायदा बांधकामांवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी. ज्या बांधकामावर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करेल त्या त्या बांधकामा विरोधात मी न्यायालयात याचिका दाखल करण्यास मागे पुढे पाहणार नाही."

- संदिप पाटील, वास्तू विशारद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com