पूछता हैं पुलिस, चॅप्टर केस क्यूँ नही दर्ज करने का? मुंबई पोलिसांकडून चॅप्टर केस प्रक्रियेला सुरवात

अनिश पाटील
Tuesday, 13 October 2020

रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यविरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत वरळी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी दर्जाच्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली असन 16 ऑक्टोबरला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या एकाहून अधिक गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे अर्नबविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. भादंवि कलम 153, 153 (अ),153 (ब), 295 (अ), 298, 500, 505 (2), 506, 120 (ब), 505 (2), 506 अंतर्गत जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाची बातमी : "राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो"; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र

कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह एका धर्माविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची चौकशीही करण्यात आली होती.

याशिवाय रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल केला होता. 29 एप्रिलला  गोस्वामी यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील झालेली गर्दी ऐवजी एका धार्मिक स्थळाजवळ ही गर्दी झाल्याचा दावा केला होता. तसेच विशेष समुदायाचे नागरीकच का गर्दी करतात, अशा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.

त्यानंतर  त्यांनी याप्रकरणी दक्षिण मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 153, 153 (अ),  295 (अ), 500, 505 (2), 511, 120 (ब), 505 (1) (ब) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत सुधीर जाबवडेकर विशेष कार्यकारी दंडाधिकारी या दर्जाने याबाबतच्या सर्व बाबीची पडताळणी करून गोस्वामी यांच्या कार्यक्रमातून धार्मिक तेढ निर्माण करणारे, एकोप्याला बाधा ठरेल अशी वक्तव्य करण्यात आली आहेत, ही खात्री पडल्यामुळे फौजदारी दंड प्र. सं. कलम 108 (1) (अ) अंतर्गत खटला दाखल करून कार्यवाही सुरू केली आहे. त्या अंतर्गत गोस्वामी यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र का घेऊन नये, यासाठी गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासाठी 16 ऑक्टोबरला सायंकाळी चारवाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आली आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 111 अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई, ठाणे आणि रायगडकरांनो लवकरात लवकर घरी पोहोचा, पुढील काही तास आहेत धोक्याचे

10 लाखांचे बंधपत्र

गोस्वामी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. विरोधीपक्षही यावेळी गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सादर करेल. विशेष दंडाधिका-यांना गोस्वामी यांच्याविरोधात कारवाई केल्यास त्यांना 10 लाखांचे बंधपत्र द्यावे लागणार आहे. या बंधपत्राचा कालावधी एक वर्षाचा असणार असून याशिवाय एक प्रतिष्ठीत व्यक्ती त्यांच्या वागणूकीवर लक्ष ठेवेल, अशा प्रतिबंधात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. 

( संपादन - सुमित बागुल )

mumbai police starts the procedure of chapter case against arnab goswami 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police starts the procedure of chapter case against arnab goswami