खोट्या मेसेजमुळे मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली, केलं हे ट्विट

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

मुंबईत पोलिसांकडून नियमावली जारी केल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याचं मुंबई पोलिसांनीच स्पष्ट केलं आहे.

 

मुंबई : कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. अशात मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या 1 जुलैपासून दुसऱ्या टप्प्यातील मिशन बिगिन अगेनला सुरुवात होईल. टप्प्याटप्प्यानं राज्य सरकारनं राज्यातील निर्बंध शिथिल केलेत. मुंबईकरांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र अशातच खोट्या मॅसेजसमुळे मुंबई पोलिसांची डोकेदुखी भलतीच वाढली आहे. मुंबईत पोलिसांकडून नियमावली जारी केल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याचं मुंबई पोलिसांनीच स्पष्ट केलं आहे. व्हायरल झालेले मेसेज खोटा असून मुंबई पोलिसांनी अशी कोणतीही नियमावली जारी केलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

मुंबईकरांच्या व्हॉट्सअॅपमध्ये हे मेसेज येऊ लागल्याने मुंबईकरांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ट्विटरवर ट्विट करुन हा मॅसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. ट्वीटमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, संबंधित मार्गदर्शक सूचना मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नाहीत. नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये आणि हा मेसेज मित्रांना किंवा कुटुंबांतील सदस्यांना फॉरवर्ड करु नये. कोणत्याही माहितीसाठी केवळ अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवा #Dial100

खरेदीसाठी एका वेळी एकालाच बाहेर पडता येणार आहे. दोघे बाहेर पडल्यास तात्काळ अटक करण्यात येईल. विनाकारण वाहने घेऊन बाहेर पडू नये. तुमच्या वाहनांवर CCTV द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे, ज्येष्ठ नागरिक जर एकटेच राहत असतील तर पोलिसांना कॉल करा, असं या खोट्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. या खोट्या मेसेजमधून तब्बल 11 सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये काहीही तथ्य नाही. या अफवा असून त्याला बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. 

ठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

काही लोकांनी खोडसाळपणे हे मेसेज व्हायरल केले आहेत. त्यामुळे तात्काळ मुंबई पोलिसांनी त्याची दखल घेत ट्विटरवर स्पष्टिकरण दिलं आहे. मुंबईत कोणतेही नवे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. मुंबई पोलिसांनीही कोणतेही नियम लादलेले नाहीत. खरेदी करण्यासाठी दोघे घराबाहेर पडल्यास अटक होण्याचे करण्यात आलेले दावे खोटे आहेत. अशा दाव्यांना बळी पडू नका. मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

 

मुंबई पोलिसांच्या नावानं व्हायरल झालेले हे खोटे मेसेज

 • मेडिकल वगळता अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरु राहतील.
 • अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीला जाण्याची परवानगी. दोन व्यक्ती गेल्यास अटक केली जाईल.
 • खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्यास तुमच्यासोबत पत्त्याचा पुरावा असलेलं कागदपत्र ठेवा, जसं की आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवावे लागणार.
 • दोन किलोमीटर परिसरातील दुकानात जाण्यासाठी चालत जाणं बंधनकारक आहे.
 • कोणीही वस्तूंच्या खरेदीसाठी कोणी वाहनाचा वापर करताना आढळलं तर वाहन जप्त केलं जाईल. (जवळच्या दुकानातूनच खरेदी करावं, असं सरकारचं मत आहे)
 • कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. खरेदीसाठी वाहने घेऊन गेल्यास तात्काळ वाहन जप्त केल्या जाईल.
 • जर तुम्ही घराजवळच्या दुकानातूनच वस्तू ऑर्डर करत असाल आणि त्याची होम डिलिव्हरी होत असेल तर डिलिव्हरी बॉयला खरे कागदपत्रे आणि हेल्मेट बाळगायला सांगा. 
 • दुकानात खरेदी करताना इतर ग्राहकापासून 5 फुटाचं अंतर ठेवा. या नियमांचा भंग केल्यास तात्काळ ताब्यात घेतलं जाईल. 
 • गृहनिर्माण सोसायटी आणि जवळच्या परिसरात फिरण्यासही परवानगी नाही. सोसायटीच्या परिसरात वाहने घेऊन फिरण्यास मनाई आहे.
 • बाहेर फिरताना तुमचं वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं तर उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं जाईल.
 • जर कोणी ज्येष्ठ नागरिक घरात एकटेच राहत असतील तर मुंबई पोलिसांना 18002002122 या क्रमांकावर फोन करा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police warns against lockdown related fake message on social media