ठराविक कंत्राटदारांसाठीच निविदा काढल्या जातात - प्रसाद लाड | Prasad Lad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasad lad

ठराविक कंत्राटदारांसाठीच निविदा काढल्या जातात - प्रसाद लाड

मुंबई : पालिकेच्या निविदा (Bmc Tender) प्रक्रिया सर्व नियम आणि केंद्रीय दक्षता आयोगाचे निर्देश डावलून काढल्या जात असून त्यामागे ठराविक कंत्राटदारांना फायदा (contractor benefits) पोहोचवण्याचे षडयंत्र (conspiracy) असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे.

हेही वाचा: मुंबई : सराईत गुन्हेगाराने केली महिलेची हत्या; १२ दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात

पालिकेच्या निविदा प्रक्रियांमध्ये उपविधी आणि पूर्व प्रस्थापित पद्धतींचा भंग करत निरोगी स्पर्धाच संपुष्टात आणली जात असल्याचेही लाड यांनी आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे. मुंबई महापालिकेत निविदापूर्व बैठकाच होत नसल्याचे लाड यांनी नमूद केले आहे. निविदा सूचना पालिकेच्या वेबसाईट वर आल्यानंतर निविदादारांबरोबर बैठक घेतली जाते. त्यात निविदादारांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी यांची चर्चा होते आणि त्यातून निरोगी स्पर्धा आकाराला येते. त्यातून पालिकेचे हित साधले जाते. मात्र गेल्या काही काळापासून ही पद्धत मोडीत निघाली आहे. त्यातून आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना निविदा दिल्या जातात, असा आरोपही लाड यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी वरळी कोळीवाड्याच्या क्लेव्हलँड बंदर येथे बसविण्याच्या मॅकेनिकल स्क्रीनच्या निविदेचे उदाहरण दिले आहे. ही निविदा मक्तेदारी पद्धतीला प्रोत्साहन देणारी आहे. निविदेमध्ये जी वैशिष्ट्ये नमूद केली गेली आहेत ते उत्पादन फक्त 'इव्हा स्क्रीन्स' या कंपनीकडूनच बनवले जाते. ज्या कंत्राटदाराचा या कंपनीशी करार असेल त्यालाच हे कंत्राट मिळणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निविदेतील उत्पादन वैशिष्ट्ये ही कंपनीच्या वेबसाईट वरून पालिकेच्या वेबसाईटवर जशीच्या तशी कॉपी पेस्ट केली गेली आहेत.

पालिकेच्या या धाडसाला दाद द्यावी तेवढी कमी आहे, असाही टोला लाड यांनी लगावला आहे. ही निविदा एका ठराविक कंत्राटदाराला डोळ्यासमोर ठेवून काढली गेली असून त्यालाच ती दिली जाईल, अशी चिन्हे आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे सांगताना लाड यांनी पालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तांवर टीका केली आहे.

loading image
go to top