Mumbai Lights Updates:मुंबई हळू हळू पूर्वपदावर; वाचा कोठे काय सुरू झाले!

टीम ई-सकाळ
Monday, 12 October 2020

मुंबईत काही ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत झाला असून, लोकलसेवाही धिम्या गतीने पुढे सरकत आहे. 

मुंबई  : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अभूतपूर्व खंडीत वीज पुरवठ्यावर राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली. लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात येत असल्याचेही डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मुंबईत काही ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत झाला असून, लोकलसेवाही धिम्या गतीने पुढे सरकत आहे. 

आणखी वाचा - कंगनाचे पुन्हा ट्विट, खंडीत वीज पुरवठ्यावर खोचक टिप्पणी

काय म्हणाले ऊर्जा मंत्री!
डॉ. नितीन राऊत म्हणाले, 'वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंते आणि कर्मचाऱ्यांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्णालय आणि रेल्वे सुरु करण्याला प्राधान्य देण्यात आले.' दरम्यान, मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील हॉस्पिटल्सना देण्यात येणारा वीज पुरवठा अखंड ठेवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिल्या. 

आणखी वाचा - मुंबईत पाणी नाही, वीजही नाही

मुंबईची सध्याची स्थिती!

  • मुंबईत सरकारी कार्यालयांमधील वीज पुरवठा पूर्ववत 
  • दादर, वरळी, नाहूर येथे वीज पुरवठा सुरू 
  • मुंबईत लोकल सेवा हळू हळू पूर्वपदावर
  • सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेचा वीज पुरवठा सुरळीत 
  • नवी मुंबईत नेरूळ, बेलापूर, खारघरमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरळीत 
  • मुंबईत ट्रॅफिकवर लक्ष ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai power cut update city back on track