esakal | कांदिवलीत गर्भवती महिलेने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव कारण...

बोलून बातमी शोधा

Pregnant Women

कांदिवलीत गर्भवती महिलेने रचला अपहरणाचा बनाव कारण...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कांदिवली भागात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता. अपहरणाचा हा बनाव रचताना संबंधित महिलेने आपल्याच नणंदेची मदत घेतली. समता नगर पोलिसांनी या महिलेचे लोकेशन शोधून काढले. त्यावेळी ती राजस्थानमध्ये होती. पोलीस RPF च्या मदतीने तिला तिथून घेऊन आले व कुटुंबीयांकडे सोपवले.

भोजपुरी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर

संबंधित महिला मूळची बिहारची असून ती भोजपुरी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करते. २०२० च्या लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावरुन तिने मुंबईतील एका युवकाशी चॅट सुरु केलं. तो मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचा. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न केले. लग्नानंतर पती-पत्नी दोघे कांदिवली पूर्वेला राहू लागले.

हेही वाचा: मुंबईत मोफत मिळणार ऑक्सिजन, कसं ते समजून घ्या...

नवऱ्याने सोबत नेले नाही

"लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सतत भांडणे व्हायची. चार एप्रिललाही दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर नवरा शूटिंगसाठी बनारसला निघून गेला. शूटिंगला जाताना नवरा आपल्याला सोबत घेऊन गेला नाही, म्हणून पत्नी प्रचंड चिडली होती" अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. महिला सहा महिन्यांची गर्भवती असल्यामुळे तिने घराबाहेर पडू नये, असे नवरा आणि सासू-सासऱ्यांनी तिला बजावले होते. पण कोविडचे निर्बंध असतानाही महिलेला लुधियानाला राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे जायचे होते.

हेही वाचा: मुंबईच्या राजकारणातील जायंट किलर एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

मास्क न घातल्याचे कारण

२३ एप्रिलला महिला नणंदेला सोबत घेऊन बाहेर पडली. ATM मधून पैसे काढण्याचे कारण तिने दिले होते. त्यानंतर नणंद एकटीच घरी परतली. वहिनीने मास्क घातला नव्हता म्हणून लोखंडवाला सर्कलजवळ दोन महिला वहिनीला गाडीत बसवून घेऊन गेल्या असे सांगितले.

पोटातील बाळ तुला पाहायचे असेल, तर...

सासू-सासरे तिला आणण्यासाठी म्हणून पोलीस ठाण्यात गेले. पण सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यात काहीच आढळले नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने नणंदेची चौकशी केल्यानंतर तिने खरे काय ते सांगितले. वहिनीने आपल्याला जबरदस्तीने कटामध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडले. पोटातील बाळ तुला पाहायचे असेल, तर मला साथ दे असे इमोशनल ब्लॅकमेलिंग करुन नणंदेला कटात सहभागी करुन घेतले.

वहिनी रिक्षात बसली व लुधियानाला जाणारी ट्रेन पकडणार असल्याचे तिने सांगितले. पोलीसांनी महिलेचे फोन लोकेशन तपासले, तेव्हा ती गुजरात वडोदरापर्यंत पोहोचली होती. तिचे फोन लोकेशन सतत बदलत होते. अखेर राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे सदर महिला आरपीएफ पोलिसांना सापडली. त्यानंतर महिलेला मुंबईत आणून तिला समजावण्यात आले.