ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर प्रक्रिया सुरू - आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rutuja latke

मुंबई महानगरपालिकेत ऋतुजा लटके यांच्या दुबार राजीनाम्याची आज दिवसभर चर्चा रंगली. परंतु पालिकेने मात्र या सगळ्या प्रकरणात राजीनाम्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर प्रक्रिया सुरू - आयुक्त

मुंबई - मुंबई महानगरपालिकेत ऋतुजा लटके यांच्या दुबार राजीनाम्याची आज दिवसभर चर्चा रंगली. परंतु पालिकेने मात्र या सगळ्या प्रकरणात राजीनाम्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबई महानगरपालिकेत ऋतुजा लटके यांनी दुसऱ्यांदा राजीनामा दिल्यानंतर पालिकेकडून या राजीनाम्यावर निर्णय अद्यापही बाकी आहे. परंतु या राजीनाम्याच्या निमित्ताने दिवसभर मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला होता. 

ऋतुजा लटके यांनी पालिकेत २ सप्टेंबरला राजीनामा हा पालिकेच्या उपायुक्त ३ यांना सादर केला होता. परंतु या राजीनाम्यामध्ये अटींसह राजीनाम्याची सूचना एक महिन्याच्या मुदतीसाठी देण्यात आली होती. जर लोकआग्रहाखातर मला विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली तर मला माझ्या कार्यकारी सहाय्यक (क्लर्क) पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मला निवडणुकीचा जाहीर होईपर्यंत माझ्या पदाचा राजीनामा देण्याची अट शिथिल करण्यात यावी असे लटके यांनी पहिल्या राजीनाम्यात लिहिले होते. या भाषेवरच पालिकेने आक्षेप घेत हा राजीनामा नियमानुसार नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून २८ सप्टेंबरला करण्यात आला. त्यानंतर दुसरा राजीनामा हा लटके यांच्याकडून ३ ऑक्टोबर रोजी पालिकेला देण्यात आला. माझी एक महिन्याची सूचना पत्राची अट शिथील करण्यात यावी. तसेच राजीनामा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देतानाच नियमानुसार राजीनाम्याच्या मुद्द्यावर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रशासनावर कोणाचाही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनाम्याच्या मुद्द्यावर दुसऱ्यांदा अर्ज आल्यानेच यासाठी पालिकेकडून तीस दिवसांच्या आतच निर्णय घेणे अपेक्षित आहे. हा राजीनामा विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी लटके यांनी अर्ज केला आहे. त्यामुळेच पालिका आयुक्तांच्या अधिकारात हा राजीनामा मंजुरीची बाब आहे. त्यांनी काम केलेल्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांचा राजीनामा मंजुर करण्यात येईल. विशेष बाब म्हणून दिलेल्या राजीनाम्यात एक महिन्याची पगाराची रक्कम पालिकेला त्यांनी अदा केली आहे. 

लटकेंचा पालिकेच्या सेवेतला तोटा

ऋतुजा लटके यांनी विशेष बाब म्हणून राजीनाम मंजुर करण्यासाठीचा अर्ज केला आहे. त्यामुळेच पालिकेकडून मिळणारे एम्प्लॉयर कॉन्ट्रुब्युशनही बुडणार आहे. तसेच २० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण न झाल्याने लटके यांना पालिकेकडून कोणतीही पेन्शन लागू होणार नाही. लटके यांच्या पगारातून वजा झालेले पैसे हे मात्र त्यांना परताव्याच्या रूपात मिळणार आहेत.