मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कर्जत-लोणावळा स्थानकांदरम्यान रुळांवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विनंतीवरून एसटी महामंडळाने या मार्गावर अतिरिक्त बस सेवा पुरवली आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. 12) शिवनेरीच्या 32 अतिरिक्त फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

मुंबई - कर्जत-लोणावळा स्थानकांदरम्यान रुळांवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विनंतीवरून एसटी महामंडळाने या मार्गावर अतिरिक्त बस सेवा पुरवली आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. 12) शिवनेरीच्या 32 अतिरिक्त फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

मुंबईसह राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर यापूर्वी तीन वेळा दरडी कोसळल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे 15 दिवसांपासून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. परिणामी मुंबई-पुणे मार्गावरील दैनंदिन प्रवाशांचे हाल होत आहेत. या मार्गावरील दैनंदिन प्रवाशांची संख्या सुमारे 25 हजार आहे. हे ध्यानात घेऊन त्यांच्या सोईसाठी मध्य रेल्वेच्या मागणीनंतर अतिरिक्त बस सेवा पुरवण्याचा आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाला दिला आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रुळांवरील दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम 16 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून रेल्वे सेवा सुरळित होईल, असे सूत्रांनी सांगितले. तोपर्यंत एसटी महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावर जादा बसगाड्या चालवाव्यात, अशी विनंती मध्य रेल्वेने पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार दादर, बोरिवली, ठाणे आणि पुण्यातील स्वारगेट व पुणे रेल्वेस्थानक या थांब्यांवरून शिवनेरीच्या अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Pune Route Shivneri Bus Extra Round