Mumbai Rain Alert:पुढचे ३ तास धोक्याचे,नागरिकांना सतर्कतेचा इशारा

समीर सुर्वे
Tuesday, 4 August 2020

दुपारी 12.47 वाजता समुद्राला 4.45 मीटरची भरती असल्यानं मुंबईसाठी पुढील 3-4 तास धोक्याचे आहेत. मिठी नदीच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईः मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.  मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यातच दुपारी 12.47 वाजता समुद्राला 4.45 मीटरची भरती असल्यानं मुंबईसाठी पुढील 3-4 तास धोक्याचे आहेत. मिठी नदीच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे

समुद्राच्या भरतीचे पाणी खाडी आणि नद्यांमधून शहराचा नाल्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकणार नाही. त्यातच पावसाचा जोर कायम राहाणार असल्याने शहरात साचलेल्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन चार तास समुद्राच्या भरतीमुळे  पावसाच्या पाण्याच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्मााण होईल.

समुद्राला भरती असताना माहिमच्या खाडीतील पाणी मिठी नदीत कुर्ला परिसरापर्यंत येते. त्यामुळे मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. नदी किनाऱ्यावरील नागरिकांना स्थालांतरीत करायचे झाल्यास पालिका शाळांही तयार ठेवण्यात आल्याा आहेत.अग्निशमन दलाचे पथकही सज्ज ठेवण्यात आलंय. 

हेही वाचाः  Local Train Update:अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या रेल्वे संदर्भातले अपडेट्स

पालिकेचं आवाहन

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या आणि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. कुर्ला, नेहरूनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी साचलं आहे. आज अनेक भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

अधिक वाचाः  मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा तडाखा, अर्धे टिळकनगर पाण्याखाली...

विभागीय नियंत्रण कक्ष आणि इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ पंपिग स्टेशन आणि २९९ पंप ठिकाणी बसविण्यात आलेत. अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (NDRF) ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्यात. 

संपादनः पूजा विचारे

Mumbai Rain Alert 3 hours dangerous mumbaikars dahisar river


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Rain Alert 3 hours dangerous mumbaikars dahisar river