गणेशभक्त विघ्नहर्त्याच्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

सिद्धिविनायक मंदिरात आसरा
पावसात अडकलेल्यांसाठी सिद्धिविनायक ट्रस्टकडूनही व्यवस्था करण्यात आली. दादर, प्रभादेवी आदी भागातील ज्या चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी अडचणी आल्या त्यांच्यासाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. रात्रभर थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली. पावसामुळे ज्यांना घरी जाणे शक्‍य नाही, अशा अनेकांनी सिद्धिविनायक मंदिरात आसरा घेतला.

मुंबई - बुधवारच्या पावसामुळे वाटेतच अडकलेल्या नागरिकांसाठी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते विघ्नहर्ते ठरले. स्वयंसेवी संस्था आणि इतर नागरिकांनी मदतीचा हात दिल्यामुळे पाऊसामुळे हाल झालेल्या प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला.

बुधवारी पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे बंद पडली. रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे ठिकठिकाणी नागरिक अडकले होते. त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था आणि त्यांच्या चहा-नाश्‍त्याची सोय अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली. परळचा राजा नरेपार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी पूर्व श्री गणेश क्रीडा मंडळ, तेजुकाया मेन्शन, काळाचौकी आंबेवाडी मंडळ, विलेपार्ले पूर्व पार्लेस्वर ढोल-ताशा पथक, जोगेश्‍वरी पूर्व श्‍यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदींनी पावसात अडकलेल्या नागरिकांना आधार दिला.

बुधवारी मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल झाल्यामुळे त्यांच्या मदतीला गणेशोत्सव व ढोल-ताशा पथके धावली. करीरोड व चिंचपोकळी रेल्वेस्थानकांत अडकलेल्या प्रवाशांना चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चहा, पाणी, बिस्कीट व वडापावचे वाटप केले. त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था मंडळाच्या सभा मंडपात करण्यात आली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी दिली. पार्ले पूर्वेतील पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाने महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांच्या चहा, पाणी व नाश्‍त्याची व्यवस्था केली. अनेक अडकलेल्या प्रवाशांनी त्या सुविधेचा लाभ घेतला, असे पार्लेस्वर ढोल-ताशा पथकाचे चेतन बेलकर यांनी सांगितले. 

भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनीही अडकलेल्या प्रवाशांची आपल्या सायनमधील कार्यालयात रात्रभर राहण्याची सोय केली. संध्याकाळी सातपासून अनेकांनी तिथे आसरा घेतला. सुमारे चारशे ते साडेचारशे जणांची जेवण-नाश्‍त्याची व्यवस्था तिथे करण्यात आली, असे लाड यांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक काही अंशी सुरू झाल्यावर त्यातील बरेच जण निघून गेले. लाड यांनीही आपल्या गाड्यांमधून काही जणांना सोडले. काही प्रवासी रात्रभर कार्यालयातच राहिले. 

अडकलेल्या प्रवाशांनी नजीकच्या कोणत्याही गुरुद्वारात आश्रय घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शीख असोसिएशनचे प्रवक्ते बाल मलकित सिंह यांनीही बुधवारी केले होते. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः दादर, सायन आदी मुख्य मार्गांवर असलेल्या गुरुद्वारांमध्येही प्रवासी आले होते. तिथे त्यांच्या जेवणाची व रात्रभर राहण्याची सोय करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Rain Ganesh Worshipper Life Saver