Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो घरीच थांबा; पुढचे 3 तास महत्त्वाचे, दुसऱ्या दिवशीही पावसाचं धुमशान

पूजा विचारे
Thursday, 6 August 2020

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसााचं थैमान सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली.

मुंबईः मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसााचं थैमान सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या तर अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्यात. तसंच दुपारी १.५१ वाजता हाय टाईडची शक्यता असल्याची माहिती मुंबई पालिकेनं दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईचं जनजीवन ठप्प झालं. जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आणि घरांमध्ये पाणी शिरले. रेल्वेरुळावर पाणी आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली.

हेही वाचाः  मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आणखी एक धरण भरले

आज पहाटेपासूनच मुंबईत कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, सायन, दादर, वांद्रेसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. 

पुढचे तीन तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. ताशी 40 ते 50 किमी वेगानं वादळी वाऱ्यासह पुढचे 3 तास पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अधिक वाचाः  चार महिन्यानंतर सुरु झालेल्या 'मॉल'ला नागरिकांनी कसा दिला प्रतिसाद, जाणून घ्या

रात्रीपासून मुंबईसह उपनगराला पावसानं झोडपून काढल्यानं आधीच सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. वादळी वाऱ्यासह सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. बुधवारी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात बुधवारी यंदाच्या मोसमातील 12 तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात 215.8 मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये 101.9 मिलीमिटर,  तर पश्चिम उपनगरांमध्ये 76.03 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Mumbai Rain live Updates heavy rainfall high tied Imd warns massive flooding


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Rain live Updates heavy rainfall high tied Imd warns massive flooding