चार महिन्यानंतर सुरु झालेल्या 'मॉल'ला नागरिकांनी कसा दिला प्रतिसाद, जाणून घ्या

चार महिन्यानंतर सुरु झालेल्या 'मॉल'ला नागरिकांनी कसा दिला प्रतिसाद, जाणून घ्या

मुंबईः चार महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर बुधवारी मॉल उघडले. मात्र ग्राहकांचा सावधपणा, ऑड डे आणि जोरदार पाऊस यामुळे पहिल्या दिवशी ग्राहकांनी मॉलमध्ये बिचकतच प्रवेश केला. नेहमीपेक्षा जेमतेम २० ते २५ टक्केच ग्राहक आल्याचं अनेक मॉलचालकांनी सांगितले. 

बुधवारपासून मॉल उघडण्यास सरकारनं परवानगी दिली असल्याने मॉलचालकांनी आधीपासूनच मॉलची स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था केली होती. बहुतेक मॉलमध्ये पुरेसे कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. बऱ्याच दिवसांनी मॉल उघडल्याने ग्राहक गर्दी करतील अशी चालकांची अपेक्षा होती. मात्र मुलांच्या शाळा आणि आई बाबांची ऑफिस हे सर्व घरूनच सुरु असल्याने अनेकांना जाता आले नाही. तरीही ज्यांना जायची इच्छा होती त्यांचा पावसाने रसभंग केला. त्यातच बुधवारी पावसासंदर्भात प्रशासनाने इशारा दिल्यामुळेही मॉलमधील अनेक दुकाने उघडली नव्हती. 

जवळपास सर्वच मॉलमध्ये गेला आठवडाभर ग्राहकांच्या स्वागताची  तयारी सुरु होती. प्रवेशद्वारावरच ग्राहकांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणीसाठी अतिरिक्त कर्मचारी साहित्यासह तैनात केले होते. ग्राहकांनी एकमेकांपासून लांब उभे राहण्यासाठी खुणा करून ठेवल्या होत्या. अगदी पार्किंगचे आणि सामानाचे पेमेंट करताना कर्मचारी आणि ग्राहक यांचा स्पर्श होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर, आदी तयारीही झाली होती. मात्र आज नेहमीच्या तुलनेत ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी होता. 

कांदीवलीच्या ग्रोवेल्स 101 मॉलमध्येही ग्राहकांच्या बॅगा निर्जंतुकीकरणासाठी अतीनील किरणांच्या कक्षात ठेवल्या जात होत्या. ग्राहकांच्या मोबाईलमध्ये आरोग्यसेतू अँप आहे का याची तपासणीही होत होती, नसल्यास ते अँप डाऊनलोड करण्यास सांगितले जात होते.75 चौरस फुट क्षेत्रफळाच्या विभागात एक ग्राहक असेल असे नियोजन केले होते. त्यासाठी थर्मल कॅमेरेही लावण्यात आले होते, तसेच कर्मचारीही पुरेसे होते.  मॉल सकाळी नऊ वाजल्यापासून उघडण्यास संमती असली तरी सर्वांच्या सोयीसाठी 11 वाजताच मॉल उघडला. या मॉलमध्ये 105 दुकाने असून नेहमीपेक्षा 15 ते 20 टक्के ग्राहक आले, विकेंडला 40 टक्के ग्राहक येतील असा अंदाज आहे, असे मॉलचे मुख्य संचालन अधिकारी सचिन धनावडे यांनी सकाळला सांगितले.

एरवी फूड कोर्ट, चित्रपटगृह, खरेदी असे करत ग्राहक तीन ते चार तास मॉलमध्ये वेळ घालवत. पण आता अर्धा ते पाऊण तासात ठरलेली खरेदी करून लोक बाहेर पडले, असेही ते म्हणाले.

घाटकोपरच्या आर सिटी मॉलमध्येही निम्मी दुकाने उघडली होती, विकेंडला सर्व दुकाने उघडण्याची अपेक्षा आहे. येथे सध्या आधी अँपॉइंटमेट घेऊनच प्रवेश मिळत होता. नेहमीच्या 15 टक्केच ग्राहक आले होते. फॅशन, मेकअप, इलेक्ट्रॉनिक्स, स्पोर्ट्स वेअर येथे लोकांनी खरेदी केली. येथे येणाऱ्या मोटारींची चाके निर्जंतुक करण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती, असे मॉलच्या प्रवक्त्याने सकाळला सांगितले.

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Unlock 3.0 consumers low Response reopen Mall Expect better footfall

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com