तुंबापुरी: विमानतळ सुरु; लोकलचा प्रवास कासवगतीने!

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

या भागासह एकंदरच शहरातील सखल व इतर भागांत साठलेल्या पाण्याचा हळुहळू निचरा होत आहे. याचबरोबर, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळही पूर्ववत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहराच्या विविध भागांत पाऊस सुरुच आहे.

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरास काल (मंगळवार) मुसळधार वृष्टीच्या बसलेल्या जोरदार फटक्‍यानंतर येथील जनजीवन आता हळुहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. पुढील 48 तासांत मुंबईमध्ये मुसळधार वृष्टी होण्याचा अंदाज आहे. मात्र सध्या शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्या अत्यंत कमी वेगाने धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज (बुधवार) सकाळी सेंट्रल रेल्वे मार्ग सुरु झाल्यानंतर सीएसटी येथून निघालेली पहिली लोकल गाडी सायन येथे तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त वेळानंतर पोहोचली. सायन माटुंगा भागामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यातच अडकलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. या भागासह एकंदरच शहरातील सखल व इतर भागांत साठलेल्या पाण्याचा हळुहळू निचरा होत आहे. याचबरोबर, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळही पूर्ववत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहराच्या विविध भागांत पाऊस सुरुच आहे.

मुंबईत काल दिवसभर कोसळलेल्या पावसाने ३३१.४ मिमी  पावसाची नोंद केली. सांताक्रूझ वेधशाळा केंद्रात ३३१.४ मिमी पाऊस झाला तर कुलाबा केंद्रात १११ मिमी पावसाची नोंद झाली

2005 नंतरचा विक्रमी पाऊस
सकाळी 8 वाजल्यापासून 12 तासांत सांताक्रूझ वेधशाळेत 297 मि.मी.; तर कुलाबा वेधशाळेत 65 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत 26 जुलै 2005 नंतर एका दिवसात झालेला हा विक्रमी पाऊस आहे. 26 जुलै 2005 ला मुंबईत दिवसभरात 900 मि.मी. पाऊस झाला होता.

शाळा, कॉलेजांना आज सुटी
मुंबईत पुढील 48 तास अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Web Title: mumbai rains