Mumbai Rains :  बेफिकीरी कोकण भवनच्या अंगलट

Mumbai Rains :  बेफिकीरी कोकण भवनच्या अंगलट

नवी मुंबई -  गेले दोन दिवस जलमय परिस्थितीत अडकलेल्या कोकण भवन प्रशासनाला महापालिका नोटीस बजावण्याची शक्‍यता आहे. भवनाच्या आवारातील डेब्रीज साफसफाई, अंतर्गत गटारांची स्वच्छता आदी बाबींची खबरदारी घेण्यात कोकण भवन प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. कोकण भवनात साठलेल्या पाण्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याने कोकण भवनला नोटीस देण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. कोकण भवन परिसरात पडलेला बांधकामांचा राडारोडा, तूंबलेली गटारे, बेवारस वस्तू व भंगार वाहनांनी व्यापलेली कोपरे याची पोलखोल सकाळने यापूर्वी बातमी छापून केली होती.  

मागील तीन दिवसांपासून नवी मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. रस्ते, बस डेपो, भूयारी मार्ग पाण्याखाली गेले होते. पावसामुळे साठलेल्या पाण्याचा फटका सरकारी कार्यालयांनाही बसला. कोकण भवनच्या आवारातील गटारांची स्वच्छता कोकण भवन सामान्य प्रशासनामार्फत घेतली जाते. कोकण भवनच्या पूर्वेकडील बाजूला मोकळ्या भूखंडावर मातीचे भराव झाले आहे. एका बाजूला मेट्रोचे काम सुरू असल्याने त्याचेही बांधकाम साहित्य पडलेले आहे. गटारावर डेब्रीज पडल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होता. पाणी तूंबण्याची संभाव्य शक्‍यता महापालिकेमार्फत वर्तवण्यात आली होती. मात्र यातून कोकण भवन प्रशासनाने काही एक शहानपण न घेतल्याने भवन परीसरात गेले दोन दिवस तलाव सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कोकण भवनच्या तळमजल्यावरील सर्व कार्यालये पाण्याने भरल्यामुळे बहुतांश महत्वाची कागदपत्रे वाचवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहीले आहे. महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी मंगळवारी (ता.२) सकाळच्या सुमारास पथकासोबत कोकण भवन, सिडको भवन व इतर सरकारी कार्यालयांची पाहणी केली. कोकण भवनसोबत ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे पोलीस ठाण्यालाही महापालिका नोटीस बजावणार आहे. गेल्या वर्षी या पोलिस ठाण्यात पाणी भरल्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातील राडारोडा उचलण्याची सूचना विभाग कार्यालयातर्फे देण्यात आली होती. मात्र यंदा पुन्हा पाणी तूंबल्यामुळे राडारोडा स्वच्छ न केल्याचे सिद्ध होऊन त्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याने संबंधित दोन्ही सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली जाण्याची दाट शक्‍यता आहे. याबाबत कोकण भवनच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सरकारी आस्थापनांचे त्यांच्या आवारातील राडारोडा व गटारे स्वच्छ करण्याचे काम स्वतंत्ररित्या केले जाते. ते करण्यासाठी याआधीच महापालिकेने बजावले होते. मात्र तरी देखील कर्तव्य केले नसेल तर कारवाई केली जाईल.
डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com