मुंबई तुंबली!, मुसळधार पावसाचा फटका रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेवर

प्रशांत कांबळे
Tuesday, 4 August 2020

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा सुद्धा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर परळ, माझगांव, सायन रेल्वे मार्गांवर पाणी साचलं आहे.

मुंबईः मुंबई उपनगरांमध्ये रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामूळे रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. यामध्ये अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा सुद्धा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर परळ, माझगांव, सायन रेल्वे मार्गांवर पाणी साचलं आहे. हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा, चेंबूर येथे रुळावर पाणी साचलं आहे. त्यासह पश्चिम रेल्वे मार्गावर दादर, प्रभादेवी पाणी साचल्याने या सर्व मार्गांवरील चर्चगेट, सीएसएमटीच्या दिशेनं येणारी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकल सेवा बंद करण्यात आलीय.

रात्री पासूनच संततधार पाऊस सुरू आहे. त्यामूळे मुंबई उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यासोबतच पश्चिम, मध्य आणि हार्बर या मार्गांवर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा ठप्प झाली आहे. 

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सर्वात आधी परेल, माझगांव येथे पाणी साचले असून त्यानंतर सायन येथे रुळावर पाणी साचून फलाटापर्यंतची पाण्यानं उंची गाठली. त्यामुळे लोकल सेवा सकाळपासूनच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यानची लोकलची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर ठाणे ते कसारा, कर्जत लोकल सेवा सुरू आहे. 

हेही वाचाः  मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा तडाखा, अर्धे टिळकनगर पाण्याखाली...

हार्बर रेल्वे

संततधार पावसाने हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा पाणी भरल्याने, हार्बर रेल्वे मार्ग सकाळी 7.30 वाजता पासून बंद करण्यात आला आहे. वडाळा, चेंबूर रेल्वे रुळावर पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी दरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली असून वाशी ते पनवेल लोकल सेवा सुरू असल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे. 

पश्चिम रेल्वे

मुसळधार पावसानं पश्चिम रेल्वे मार्ग सुद्धा विस्कळीत झाला होता. दादर आणि प्रभादेवी रेल्वे मार्गावरील रुळावर 200 एमएम पाणी साचलं होतं. त्यामुळे चर्चगेट ते वांद्रे दरम्यान लोकल सेवा बंद करण्यात आली होती. वांद्रे ते डहाणू दरम्यानची लोकल सेवा सुरू असल्याचे पश्चिम रेल्वे सांगितलं आहे. 

अधिक वाचाः Local Train Update:अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या रेल्वे संदर्भातले अपडेट्स

दरम्यान पाऊस ओसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे चर्चगेट वरून धिम्या गतीची लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. चर्चगेटवरून पहिली लोकल 12.5 मिनिटानं सोडण्यात आली आहे. तर अंधेरीहून जलद मार्गावरील पहिली लोकल 11.40 वाजता सोडण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं आहे.

मध्य रेल्वेच्या चार एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

बंगरूळ जाणारी उद्यान एक्सप्रेस

लखनऊ जाणारी पुष्पक एक्सप्रेस

गोरखपूर जाणारी एलटीटी गोरखपूर एक्सप्रेस

वाराणसी जाणारी एलटीटी वाराणसी कामायणी एक्सप्रेस

(संपादनः पूजा विचारे) 

mumbai rains latest updates local train services stop 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai rains latest updates local train services stop